कोरोनामुक्तांच्या प्रमाणात प्लाझ्मा दान कमी

कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या प्लाझ्मामध्ये ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. या ऍन्टीबॉडीजचा उपयोग कोरोनावरील उपचारांमध्ये होतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्याची गरज आहे. प्लाझ्मा दानानंतर ऍन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक वाढते. आपल्याकडे कोरोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. पण त्यांच्याकडून प्लाझ्मा दानाचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी कोरोना मुक्त झालेल्यांचे प्लाझ्मा दानासाठी कौन्सिलिंग करणे गरजेचे आहे असे मत माहीमच्या हिंदुजा रुग्णालयातील ट्रान्सफ्युजन मेडिसीन आणि हिमॅटॉलॉजी कन्सल्टंट डॉ. आनंद देशपांडे यांनी दै. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत क्यक्त केले.

प्लाझ्मा म्हणजे काय?

रक्तामध्ये लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेटस् असतात आणि रक्तातील द्रवरूप पदार्थ म्हणजे प्लाझ्मा असतो. प्लाझ्माचा रंग पिवळसर असतो. रक्ताच्या गुठळय़ा करण्याचे काम करत असतो.

प्लाझ्माचा उपयोग कधी व कोणत्या रुग्णावर केला जातो?

रक्तस्राव होत असलेल्या रुग्णाला प्लाझ्मा दिला जातो. डेंग्यूमध्ये रुग्णाला रक्तस्राव होत असल्यास रुग्णाला प्लाझ्मा दिला जातो.

कोरोना रुग्णाला प्लाझ्मा कसा उपयोग होऊ शकतो?

कोरोना रुग्ण बरा होतो तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाच्या विरोधात ऍण्टीबॉडीज तयार होतात. या ऍन्टीबॉडीज प्लाझ्मामध्ये असतात. म्हणून रुग्ण बरा होतो. यशस्वी उपचारानंतर 28 दिवसांनी त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतील तर आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे ती व्यक्ती प्लाझ्माचे दान करू शकते. या प्लाझ्माचा कोरोना रुग्णावरील उपचारांमध्ये फायदा होतो. हा काही रामबाण उपाय नाही.

प्लाझ्मा रक्तातून कशा पद्धतीने काढून घेतला जातो?

रक्तातील प्लाझ्मा काढून घेण्याचे दोन प्रकार आहेत. रक्तपेढीत जाऊन एखादा रक्तदाता रक्तदान करतो तेक्हा त्याच्या रक्तातील रक्तघटक व प्लाझ्मा वेगळा करण्याचा एक प्रकार आहे. आणि दुसऱ्या पद्धतीत एका  मशिनच्या मदतीने (ऑफरेसीस तंत्रज्ञान) दात्याच्या शरीरातील फक्त प्लाझ्मा काढून घेतला जातो. इतर रक्तघटक पुन्हा शरीरात सोडतात. दात्याच्या रक्तातील प्लेटलेटस् ज्या मशिनच्या मदतीने काढून घेण्यात येते त्याच मशिनच्या मदतीने प्लेटलेटस्ऐवजी प्लाझ्मा काढून घेतला जातो.

एका दात्याच्या रक्तातील किती प्रमाणात प्लाझ्मा काढून घेतात?

जेव्हा एखादा रक्तदाता रक्तदान करतो तेव्हा एका पिशवीतील रक्तघटक म्हणजे लाल पेशी, प्लेटलेट व प्लाझ्मा वेगळा करतात. तेव्हा एका पिशवीतून 200 एमएल प्लाझ्मा उपलब्ध होतो.  मात्र जेव्हा फक्त प्लाझ्मा काढून घेतला जातो तेव्हा मात्र 500 एमएल प्लाझ्मा उपलब्ध होतो.

प्लाझ्मा काढून घेण्यासाठी किती केळ लागतो?

जेव्हा दात्याच्या रक्तातील फक्त प्लाझ्मा काढून घेण्याची प्रक्रिया सुमारे एक तास चालते. ही सर्व प्रक्रिया अतिशय सुरक्षित असते. उपकरणे पूर्णपणे निर्जंतूक केलेली असतात. ही प्रक्रिया अतिशय सुरक्षित असते.

प्लाझ्मा दान किती वेळा करता येते?

एकदा रक्तदान केल्यावर किमान तीन महिने पुन्हा रक्तदान करता येत नाही. मात्र ऑफरेसीस तंत्रज्ञानाने केले तर प्लाझ्मा पुन्हा आठ दिवसांनी दान करता येतो. अगदी वर्षातून चोवीस वेळाही प्लाझ्मा दान करता येते.

इतर व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्माचा उपयोग कोरोनाच्या रुग्णाला होतो का?

ज्याला कोरोना झालेला नाही त्याच्या रक्तात ऍण्टीबॉडीज राहात नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तीचा प्लाझ्मा कोरोनावरील उपचारांसाठी करता येत नाही. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीचाच प्लाझ्मा उपचारांसाठी उपयोगात येतो.

कोरोनामुक्त झालेली झालेली व्यक्ती प्लाझ्मा दानासाठी तयार होते का?

प्लाझ्मा दान केल्यावर पुन्हा कोरोना होईल किंवा प्लाझ्मा दानानंतर ऍण्टीबॉडीज कमी होतील अशीही भीती असते. पण ऍण्टीबॉडीजची पातळी कमी होत नाही. उलट प्लाझ्मा दानानंतर अधिक प्रमाणात ऍण्टीबॉडीजची निर्मिती होते. यासाठी दात्याच्या काऊन्सिलिंगची गरज आहे. कोरोनावरील यशस्वी उपचारांनंतर रुग्णालयातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचे मनोधैर्य वाढलेले असते. कौन्सिलिंगसाठी हीच वेळ अतिशय योग्य असते. प्लाझ्मा दान करण्यासाठी येण्याचे आवैहन त्याला त्यावेळी करावे. कोरोना मुक्त झालेल्यांकडून प्लाझ्मा दान करण्याचे प्रमाण फार कमी आहे.  त्यासाठी त्यांच्या मनातली भीती काढण्याची गरज आहे.

खासगी रुग्णालयांना प्लाझ्मा दानात सहभागी करून घ्यावे का?

खासगी रुग्णालयात तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि तज्ञ डॉक्टर्सही आहेत. त्यांचाही यामध्ये उपयोग करून घेता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या