कोरोनाविरुद्ध लढायला हवे; पण आता उद्योगधंदेही सुरू करावे लागतील! शरद पवार यांचे परखड मत

1950
sharad-pawar-new1

कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला संपूर्ण देश आज करत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच राहील पण आता हळूहळू लॉकडाऊन उठवून उद्योगधंदे सुरू करायला पाहिजेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेले पॅकेज तुटपुंजे ठरत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात उत्तम काम चालले असून चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची प्रशंसा करताना विरोधकांना खडेबोल सुनावले. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेला राजकीय आणि प्रशासकीय स्थिरता हवी आहे, त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार योग्य दिशेने पुढे जात असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे बाबतचे अनुमान काय आहे?
महाराष्ट्रातील आमचे सरकार सुरळीत चालले असून अस्थिरतेचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजप नेत्यांनी राज्यात बेकायदेशीरपणे सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या मनात आजही त्याचे शल्य असून विरोधक अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यामुळे सरकार अस्थिर असल्याबाबतच्या बातम्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अधूनमधून पसरवल्या जातात. माध्यमे देखील त्याला हवा देण्याचा प्रयत्न करतात. खरंतर संकटाच्या काळात विरोधी पक्षाने सरकारसोबत एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोरोनाचे संकट हा एक राष्ट्रीय प्रश्‍न असून महाराष्ट्रासह अन्य राज्ये झुंज देत आहेत. त्यावरून राज्य सरकारला नामोहरम करण्याचे कोणतेही कारण किंवा आधार नाही. महाराष्ट्रातील जनतेला राजकीय आणि प्रशासकीय स्थिरता हवी आहे आणि आमचे सरकारची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे विश्लेषण कसे कराल?
उद्धव ठाकरे हे सरकार आणि विधिमंडळात नवीन आहेत. ते प्रथमच सरकार किंवा एखाद्या आघाडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत. तथापि त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनुभवी मंत्री असले तरी सकारात्मक कार्यशैली आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण करून काम करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पद्धतीमुळे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे एक उत्तम आणि सक्षम नेतृत्व लाभले आहे. आघाडी सरकारमधील भागीदार यांची नियमितपणे सल्लामसलत करून किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली जात आहे.

महाराष्ट्रात साथीच्या आजाराच्या तीव्रतेकडे कसे पाहता?
महाराष्ट्राची विशिष्ट वैशिष्ट्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. राज्यात मुंबईसह बरीच मोठी शहरे आहेत. या ठिकाणी गर्दीचे प्रमाण आणि लोकसंख्या जास्त आहे. तेथील बहुसंख्य लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. उदाहरणार्थ मालेगावमध्ये विशेषत: अल्पसंख्याक समुदायातील लोक घराच्या शेजारी किंवा घरातच बसून हातमागावर काम करतात. तसेच राज्यात देश-विदेशातून येणाऱ्या लोकांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखणे कठीण होते. आणि विषाणूच्या संक्रमणाचा प्रसार होण्यास मदत होते. परंतु गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता सकारात्मक चित्र दिसून येत असून या संकटातून राज्य निश्चित बाहेर पडेल याची खात्री आहे.

मुंबई, महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये शिथिलता किंवा नियम कठोर करता येतील का?
देशात आणि राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असून व्यवसाय, उद्योग, कारखाने आणि कामाची ठिकाणी सर्वच बंद आहेत. याचा त्रास होत असला तरीही सर्वांनी सहकार्य केले. केंद्राच्या मनात काय आहे हे माहिती नाही, परंतु मला वाटते की, आता आपण लॉकडाऊन हळूहळू उठवण्यास सुरुवात केली पाहिजे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. महामारीचा मुकाबला करताना नक्कीच आम्हाला सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छताविषयक उपाययोजना कराव्या लागतील तसेच कामाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावर नियंत्रण आणावे लागेल. या संदर्भात आघाडी सरकारमधील सहकारी पक्ष आणि उद्योगांचे प्रमुख आणि तज्ज्ञांशी चर्चा करत आहे. महाराष्ट्र हे असे एक राज्य आहे, जे केवळ आपल्या लोकांनाच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तरेकडील राज्ये आणि हिंदुस्थानच्या इतर भागातील लोकांनाही रोजगार देते. महाराष्ट्रातून दररोज 40 हून अधिक गाड्या प्रवासी मजुरांना घेऊन जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने (अमित शहा) प्रत्येक प्रचार सभेत विचारले शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले? पवार आणि महाराष्ट्राने हेच केले आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दुर्दैवाने भाजपला ते समजू शकत नाही किंवा त्याचे कौतुकही नाही.

परप्रांतीय कामगारांबाबत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबत काय वाटते?
परराज्यातील कामगारांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी घटनात्मक अधिकार आणि लोकांचे स्वातंत्र्य समजून घेतले पाहिजे. यासाठी त्यांनी आधी राज्यघटनेचे वाचन केले पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे.

ज्या पद्धतीने परप्रांतीयांना परत पाठवले गेले त्याबद्दल आपले मत काय?
परराज्यातून आलेल्या मजुरांना ज्या पद्धतीने पाठवण्यात आले तो प्रसंग अत्यंत दयनीय आणि धक्कादायक आहे. प्रथम केंद्राने घाईघाईत लॉकडाऊनची घोषणा केली. आणि चुकीची माहिती देत अमानुष पद्धतीने मजुरांना परत पाठवण्यात येत आहे. घरी पोहोचल्यानंतर ही त्यांना कोणत्या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल याची मला चिंता वाटते.

शेतकऱ्यांसाठी पॅकेज आणि थेट उत्पादनांची विक्री याबाबत काय सांगाल?
पिकांचे नुकसान, खरेदीचा अभाव, शेतीसाठी वेळेवर कर्ज न मिळणे त्याचबरोबर उत्पादनाला योग्य हमीभाव आधी कारणांमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. केंद्र सरकारने जे काही पॅकेज देऊ केले त्यातून त्यांना अर्थपूर्ण दिलासा मिळालेला नाही. इतर राज्यात शेतमालाची थेट विक्री करण्यास परवानगी देणे यात काहीच नवीन नाही. युपीए सरकारच्या काळात आम्ही कृषी आणि पणन मंत्र्यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला होता आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील आंबे किनारपट्टी भागातील राज्ये व कोलकाता आदी शहरात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. हिमाचल आणि कश्मीर मधील सफरचंद देशाच्या इतर भागात उपलब्ध होत आहेत.

चीन आणि नेपाळसोबतच्या तणावात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी करण्याची ऑफर याबाबत तुमचे काय मत आहे?
हिंदुस्तान पारंपरिकपणे नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि शांततापूर्ण संबंध ठेवून आहे. नेपाळमधील विकासकामांमुळे सध्या जो काही प्रश्न निर्माण झाला आहे, त्याबाबत लवकरात लवकर सरकार शांततेने मार्ग काढेल. हिंदुस्थान आणि चीनपेक्षा सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात जे काही चालले आहे, त्यामुळे चीनमध्ये तणाव जास्त आहे. अशा वेळी ट्रम्प यांच्या मध्यतीच्या प्रस्तावाचा अजिबात विचार करू नये, हिंदुस्थान आणि चीन थेट प्रश्न सोडवावा.

मोदी पर्व-2 च्या पहिल्या वर्षाबद्दल मूल्यांकन काय आहे?
मोदी सरकार दुसऱ्या पर्वातील कामगिरीचे मूल्यांकन एका वर्षातच करणे खूप घाईचे ठरेल. सत्तेचे बरेच केंद्रीकरण झाले आहे, जे संघराज्य आणि विकेंद्रीत प्रशासनाच्या तत्वाच्या विरोधात आहे. दुसरे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक तणाव निर्माण करण्यापेक्षा समाजातील शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारने पार पाडली पाहिजे. अशी दोन निरीक्षणे सद्यपरिस्थितीत नोंदवता येतील.

राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची स्थिती कशी आहे?
देशपातळीवर बावीस पक्ष आज विरोधी पक्षात आहेत. नुकतीच सर्व विरोधी पक्षांची बैठक झाली. यामध्ये सर्वांनी एकत्र मिळून समन्वयाने काम करण्याचा संकल्प केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या