
एका साबणाच्या जाहिरातीत बंटी नावाचा मुलगा आपला हात धुवत असतो आणि त्याला मुलं बंटी तुझा साबण स्लो आहे का? असे म्हणून विचारतात. परंतु आता बंटीचीच ट्रीक फायद्याची ठरणार आहे. साबणाने जास्त वेळ हात धुतल्यास कोरोनाची लागण होत नाही असा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे विषाणू राहत नाही असेही संशोधकांनी म्हटले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. चेहरा, डोळा आणि नाकाला हात लावायचा नाही जेणेकरून कोरोनाचा फैलाव होत नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करा असेही डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु सॅनिटायझरपेक्षा साबण जास्त प्रभावी आहे असा दावा संशोधकांनी केला आहे. इंग्लडमधील साऊथ वेल विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल थॉर्डर्सन म्हणालेकी कोरोनापासून वाचण्यासाठी साबण जास्त प्रभावी आहे. साबणात फॅटी ऍसिड आणि मीठासारखे तत्व असतात. वायरस एका रसायनामुळे चिकटतो. साबणाने हात धुतल्यास हे रसायन नष्ट होते असे प्राध्यापक पॉल यांनी सांगितले आहे. तसेच साबण त्वचेच्या प्रत्येक भागात गेल्याने कीटाणू मरतात असेही त्यांनी नमूद केले आहे. म्हणून कोरोनापासून वाचण्यासाठी धुवत रहा, धुवत रहा.
बोस्टन मेडिकल सेंटरचे डॉक्टर नाहिद म्हणाले की साबण किंवा सॅनेटाईझर जर योग्य पद्धतीने नाही वापरले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून कोरोनाशी लढण्यासाठी तसे उत्पादनही प्रभावी असले पाहिजे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सॅनिटायझरपेक्षा साबण जास्त उपयोगी असल्याचे म्हटले आहे.
देशातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. देशात एकूण 73 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 11 रुग्ण आढळले आहेत. पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या सहापैकी दोन रुग्णांचे ब्लड रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यात काल पाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून मुंबईकरांसह राज्यातील जनतेने घाबरू नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.



























































