ज्येष्ठ कलाकारांच्या शुटींग पूर्वी टेस्ट कराव्यात – सुबोध भावे

फोटो सौजन्य- फेसबुक

एका मराठी मालिकेच्या चित्रीकरणासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर या सातारा येथे गेल्या होत्या. चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने मराठी चित्रपट तसेच मालिकासृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सोमवारी कळाले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर अभिनेते सुबोध भावे यांनी एक आवाहन केले होते. सिनेसृष्टीला सरकारने अटी घालून परवानगी दिली, परंतु आपण काळजी घेतली नाही तर त्याचा काय उपयोग? असा सवाल करत भावे यांनी ज्येष्ठ कलाकारांच्या शूटिंग पूर्वी कोरोना टेस्ट अनिवार्य कराव्यात असे ते म्हणाले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना सातारा येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना सुबोध भावे आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सोमवारी एका ऑडिओ क्लिपद्वारे कलाकारांना आवाहन केले होते. सुबोध भावे म्हणाले की “सरकारला आपण विनंती केल्यानंतर सरकारने अटी घालून परवानगी दिली. अशावेळी आपण आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. ज्येष्ठ कलाकारांच्या सर्व चाचण्या केल्या पाहिजेत. तसेच त्यांची शूटिंगच्या ठिकाणी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सरकारने दिलेल्या सूचना गांभीर्याने घ्या आणि दिलेल्या परवानगीचा त्यांना पुन्हा विचार करावा लागेल असे वागू नका.” आदेश बांदेकर म्हणाले शूटिंगला परवानगी दिल्यानंतर आपण योग्य काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. मी सर्व कलाकारांना विनंती करतो की आपली आणि आपल्या कलाकारांची काळजी घ्या प्रत्येकाचा जीव हा महत्वाचा आहे आपले नुकसान होईल असे वागू नका असे ते म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या