
चीनच्या व्यूहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने इटली, इराण आणि अमेरिकेत थैमान घातले आहे. चीनबाहेर इटली या देशात सर्वाधिक बळी गेले आहेत. हिंदुस्थानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी हा आकडा 131 वर पोहोचला. महाराष्ट्रमध्येही कोरोनाचे सर्वाधिक 39 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा वाढता धोका पाहता शाळा, कॉलेजला 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली असून मंदिर, मशीद आणि प्रार्थनास्थळांवर गर्दी कमी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. सरकारच्या आवाहनानंतर राज्यातील मोठ्या यात्रा, जत्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. तसेच अनेक मोठ्या मंदिरांमध्ये आणि पर्यटनस्थळी गर्दी कमी होण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मोठमोठ्या मंदिरातील दर्शन बंद करण्यात आले असून पर्यटनस्थळीही ‘नो एन्ट्री’चे बोर्ड लागले आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यामुळे मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर, मुंबदेवी मंदिर, कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर, नरसोबाची वाडी, तुळजापूरचे भवानी मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रुख्मिनी मंदिर, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, परळीचे वैद्यनाथ मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, देहू येथील संत तुकाराम आणि रत्नागिरी येथील गणपती पुळे मंदिर पुढील आदेश येईपर्यंत भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय झाला आहे. सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असले तरी वैद्यकीय मदत सुरू राहणार असल्याचे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले आहे.

प्रसिद्ध मंदिरांसह पर्यटकांच्या आवडत्या पर्यटन स्थळीही ‘नो एन्ट्री’चा बोर्ड झळकला आहे. मुंबईतील जुहु बीच, फोमिंगो सफारी आणि ठाणे खाडी, सागरी व जैवविविधता केंद्र, राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राज्यातील राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी व सागरेश्वर अभयारण्य, गडचिरोली येथील हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प, जळगाव येथील यावल वन्यजीव अभयारण्य, धुळे येथील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य, नाशिक येथील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य, कळसुबाई-हरिश्चंद्र गड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

महत्त्वाच्या हॉस्पिटलजवळची वाहतूक बंद
‘कोरोना’चा वाढत्या प्रभावाचा पार्श्वभूमीवर ‘कोरोना’वर उपचार सुरू असेलेले पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्ससह पालिकेचे केईएम रुग्णालय परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.
घरून कामाची मुभा द्या
शिवाय खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, शाळा, स्विमिंग पूल, जिम, चित्रपटगृह बंद ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच कार्यक्रम आयोजित करू नये, चौपाटीवर एकत्र जमू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.



























































