जगात सर्वात अधिक कोरोनाग्रस्त अमेरिकेत, इटली आणि चीनलाही मागे टाकले

2981

संपूर्ण जगात चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रसाराला सर्वात पहिले सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी चीनमध्ये हा विषाणू पसरला आणि हळूहळू या विषाणूने जगभरात आपले हातपाय पसरले. सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधित कोरोनाग्रस्त असून इथल्या आकड्याने चीन आणि इटलीलाही मागे टाकले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले असून यामध्ये म्हटलं आहे की अमेरिकेत 81,321 कोरोनाग्रस्त आहेत. चीनमध्ये सध्याच्या घडीला 81,285 कोरोनाग्रस्त आहेत तर इटलीमध्ये 80,539 कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेमध्ये या आजारामुळे आतापर्यंत किमान 1000 जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने अमेरिकेतील केंद्रीय यंत्रणा, राज्यातील यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन अशा तीनही यंत्रणांकतडून आकडे गोळा केले होते. या आकड्यांच्या आधारावर त्यांनी ही बातमी दिली आहे. अमेरिकेमध्ये 33 कोटी जनता असून तो देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीमध्ये म्हटलंय की अमेरिकेने या विषाणूच्या होणाऱ्या फैलावाला गांभीर्याने घेतलं नाही. चीनमध्ये या विषाणूने हाहा:कार उडवल्यानंतरही अमेरिका सावध झाली नाही. व्यापक प्रमाणावर चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात अनेक त्रुटी निर्माण झाल्या आणि मास्क तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठीची बचाव सामुग्री ही देखील अल्प प्रमाणात होती. व्हेटींलेटरचेही प्रमाण तिथे कमी होते. या सगळ्यामुळे तिथली परिस्थिती गंभीर बनली असं या बातमीत म्हटलं आहे.

पहिला रुग्ण आढळला तेव्हापासूनच अमेरिकेने सावध व्हायला हवं होतं. चाचणी आणि रुग्ण शोधण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी होती असं अँजेला रासमूसेन यांनी म्हटले आहे. त्या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारासंदर्भात सातत्याने संशोधन करत असतात.चीनमध्ये यापूर्वी सार्स आणि बर्ड फ्लूचा फैलाव झाला होता. तेव्हापासूनच तिथलं नेतृत्व हे अशा संसर्गजन्य आजाराबाबत धीम्यागतीने प्रतिसाद देताना दिसतं . वुहानमध्ये जेव्हा या विषाणूमुळे उद्रेक झाला तेव्हा सुरुवातीला स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबतच्या बातम्या दाबून ठेवल्या. मात्र जेव्हा आजार वणव्यासारखा पसरायला लागला तेव्हा तिथल्या एकाधिकारशाही असलेल्या सरकारने अत्यंत वेगाने आजार नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. जपान, दक्षिण कोरिया, तैवान, सिंगापूर यांनीही तातडीने आजाराशी मुकाबला करण्यासाठी अत्यंत वेगाने सज्जता केली. आजाराशी मुकाबला करण्याऐवजी अमेरिकेत मात्र राष्ट्रपतींविरोधात महाभियोग, हार्वी विन्स्टीन, ब्रेक्झिट, ऑस्कर अशा भलत्याच गोष्टी सुरू होत्या असं न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या