
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे. 13 हजारपेक्षा जास्त मृत्यू आणि 2 लाखांपेक्षा रुग्ण यामुळे या साथीच्या रोगाचा सर्वांनी धसका घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देश लोकांमध्ये जागरूकता वाढवत आहे. मात्र काही लोकांच्या चुकीची शिक्षा हजारो लोकांना बसण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे एका महिला डॉक्टरने लपवल्याने शेकडो लोकांचा जीव संकटात आला आहे.
एक महिला डॉक्टर हॉलिडेला दुसऱ्या देशात गेली होती. मात्र परत आल्यानंतर तिने आपल्या विदेशी प्रवासाचा इतिहास लपवून ठेवला. यामुळे 1200 लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. विदेश दौऱ्याचा इतिहास लपवून नागरिक आणि रुग्णांच्या संपर्कात आल्याप्रकरणी महिलेला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहे. रशियातील ही घटना आहे.
इरिना सन्निकोवा नावाची ही महिला डॉक्टर स्पेनमधील माद्रिद येथे सुट्टीसाठी गेली होती.सुट्टीवरून आल्यानंतर तिने स्वतःला क्वारंटाईनही केले नाही आणि आयसोलेटही केले नाही. या महिलेने शेकडो लोकांच्या ), डॉक्टरांच्या भेटी-गाठी घेतल्या. ‘द सन’च्या वृत्तानुसार आतापर्यंत या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 11 नागरिकांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. तर अन्य संशयित लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी महिलेवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असून जवळपास 5 वर्षांसाठी तिला जेलची हवा खावी लागू शकते.



























































