कोरोनाचे साइड इफेक्ट ‘वेलनेस’ रोखणार! निम्म्या खर्चात होणार चाचण्या, इतर व्याधीग्रस्तांनाही फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावर यशस्वीरीत्या मात केल्यानंतरही अनेकांमध्ये कोविडच्या ‘साइड इफेक्ट’मुळे प्रकृतीच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘वेलनेस’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी निम्म्या खर्चात तब्बल 50 प्रकारच्या चाचण्या होणार आहेत. यानंतर आवश्यक उपचार, समुपदेशन आणि जनजागृतीही करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोना पूर्ण आटोक्यात आल्यामुळे सर्व निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाच्या तीन लाटा परतवल्यानंतरही कोरोनावर मात केलेल्यांना कोविडच्या साइड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून चाचण्या करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या आजाराचे निदान झाल्यामुळे वेळेत उपचार झाल्यामुळे रुग्णांना वेळीच आजारावर मात करणे शक्य होणार आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात मार्च 2020 पासून आतापर्यंत सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक कोविडबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. आता सेव्हन हिल्स रुग्णालयात पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वेलनेस’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र राज्य संचालक डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. स्मिता चव्हाण, विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र पुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर कृष्णमूर्ती उपस्थित होते.

असा होणार फायदा

कोरोनामुक्त झाल्यानंतर कालांतराने थकवा, आळस, मधुमेह, हृदयाचे ठोके तात्पुरते अचानक वाढणे, श्वास घेण्यास अडथळा, हृदयाची गती वाढणे असे त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा आजारांचे निदान करून घेण्यासाठी नियमितपणे चाचण्या करण्यासाठी होणारा खर्च सर्वसामान्य व्यक्तींच्या आवाक्यात नसतो. त्यामुळे ‘वेलनेस’ उपक्रम फायदेशीर ठरणार आहे

यामध्ये नियमित रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, डी डायमर, एचएस-सीआरपी, लिव्हर फंक्शन टेस्ट, रेनल फंक्शन टेस्ट, प्रोथ्रोम्बिन टाईम, ईसीजी, टुडी इको, पल्मनरी फंक्शनिंग टेस्ट, एचआरसीटी, नाक-कान-घसा तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी यासह विविध चाचण्या या उपक्रमातून होणार आहेत.