हा एकटेपणा मानसिक आघात करणारा; आजूबाजूला कुणी नाही… डॉक्टरही जवळ येत नाहीत

2612

रात्रीच्या अंधारात, कोल्डरूमच्या थंडीत मी गात राहतो. झोप यावी म्हणून डोळे मिटून घ्यायचा प्रयत्न करतो. आजूबाजूला कुणी नाही. ज्यांच्या देखरेखीखाली उपचार होतात ते डॉक्टरही जवळ येत नाहीत. कित्येक दिवस माणसाचं दर्शन नाही… ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी रविवारी आयसोलेशन वाॅर्डमधील एकटेपणाचा अनुभव शब्दबद्ध केला. तसेच या वातावरणाचा रुग्णांवर मानसिक परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली.

वैद्यकीय क्षेत्र हतबल

बिग बींच्या मते, तुम्ही भले कोरोनामुक्त झालात, तरी तीन चार आठवडय़ापर्यंत सौम्य तापदेखील दुर्लक्षित करता येणार नाही. या आजाराची फूलप्रूफ उपचारपद्धती जगाला मिळालेली नाही. प्रत्येक केस वेगळी आहे. प्रत्येक दिवशी एक नवीन लक्षणं निरीक्षण आणि संशोधनंतर्गत येतं. वैद्यकीय क्षेत्र याआधी इतकं हतबल कधी नव्हतं… एक – दोन प्रांतात नव्हे तर अवघ्या जगात ही स्थिती आहे. ‘ट्रायल ऍण्ड एरर’ ला कधी एवढी मागणी नव्हती, असंही अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलंय.

वाॅर्डमध्ये माणसाचं दर्शन होत नाही. नर्स आणि डॉक्टर व्हिजिट देतात. मात्र ते पीपीई कीटमध्ये असतात. ते कोण आहेत, कसे दिसतात, कसे बोलतात, त्यांचे हावभाव काहीच कळत नाहीत. त्यांचा वावर ’रोबोट’ सारखा असतो. दिलेल्या सूचनांचे पालन करून ते निघून जातात.

अमिताभ म्हणातात, हे ठीक असलं तरी याचा रुग्णाच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होतो का? मानसोपचारतज्ञ सांगतात, हो परिणाम होतो. डिस्चार्ज मिळाल्यावर रुग्णांची चिडचिड वाढते. त्यांना बाहेर जायची भीती वाटते. लोक आपल्याला वेगळी वागणूक देतील, वाळीत टाकतील ही भीती वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या