थोडा संयम बाळगूया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संग्राम चौगुले (शरीरसौष्ठवपटू)

गेल्या सात महिन्यांपासून व्यायामशाळा बंद आहेत. कोरोनाचा सगळय़ात मोठा फटका फिटनेस उद्योगाला बसला आहे. पण संयम आणि धीराने यावर मात करायला हवी.

गेल्या सहा महिन्यांपासून जिम बंद आहेत. खेळाडू, बॉडीबिल्डर यांच्याकरिता जिम सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे. तरीही सुरुवातीला आम्ही स्वीकारत होतो ही सगळी परिस्थिती, अजूनही वाट पाहतच आहोत. मात्र आता जिम बंद राहणे ही परिस्थिती स्वीकारणे काही जणांना कठीण होऊ लागले आहे. बऱयाच जणांचे जिमअंतर्गत वेगवेगळे व्यवसाय बंद होऊ लागले आहेत.

जिम चालवणाऱयांना पैसे मिळायचे बंद झालेत. घरात खर्च सुरूच आहे, कर्जाचे हप्ते सुरू आहेत. जिममध्ये जाणारे सप्लिमेंट वापरतात. त्यांचं काम बंद आहे. तसेच जिममध्ये जी यंत्रे आहेत ती आणि त्यांची काळजी घेणाऱयांची कामंही बंद आहेत. त्यामुळे एक जिम बंद असल्यामुळे एवढय़ा सगळ्या गोष्टी बंद आहेत. तरीही बंद असलेल्या जिमशी संबंधित खर्चही सुरूच आहेत. प्रत्यक्ष पाहता जे सभासद नियमित जिममध्ये येतात, त्यातील प्रत्येकालाच घरी व्यायाम करणे शक्य होतंच असं नाही. वर्कआऊट केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नियमित व्यायाम करणाऱयांपैकी 99 टक्के लोकांना कोरोनाची लागण झालेली नाही हे लक्षात आलेले आहे.

नियमित जिमला जाणारे घरी राहून काय काळजी घेऊ शकतात?

  •  योगासने करा.
  • सूर्यनमस्कार, प्राणायाम करा.
  • सकाळी लवकर उठून चालायला जा.
  • स्ट्रेचिंगचे व्यायाम करता येतील.
  • मेडिटेशन करा.

जिम सुरू झाल्या तर कोरोना वाढू शकतो असे सरकारचे म्हणणे आहे. जिममध्ये येणाऱयांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांचा आहार, आरोग्य, व्यायाम याविषयी माहिती देणं हेच आमचं काम आहे. कोरोना इथे नियंत्रणात येऊ शकतो, रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. कारण एखादा क्रिकेटर, कबड्डीपटू किंवा इतर खेळाडू, प्रोफेशनल बॉडीबिल्डर यांच्याकरिता जिम सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय जिममध्येही सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर सामाजिक अंतर राखून सुरू करायला हव्यात, जेणेकरून तिथल्या प्रत्येक कर्मचाऱयाला काम मिळेल, त्यांचे व्यवसाय सुरू होतील असं माझं मत आहे.

जिममध्ये येणाऱया सभासदांची कशी काळजी घेतली जाईल?

  • कमीत कमीत कमी लोक एका बॅचमध्ये घेतले जातील. दोन व्यक्तींमध्ये जास्तीत जास्त अंतर असेल याची काळजी घेतली जाईल.
  • प्रत्येक बॅचमध्ये 15 मिनिटं जिम सॅनिटाईझ करण्यासाठी वेळ दिला जाईल.
  • कार्डियाक विभाग आम्ही बंद करत आहोत. काहींना श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी असतात याकरिता.
  • प्रत्येक सभासदाकरिता वैयक्तिक सॅनिटायझेशन करावेच लागणार आहे.
  • जुन्या सभासदांसह नवीनांनाही प्रवेश दिला जाईल.
  • ट्रेनरसह जिममधील सर्व कर्मचाऱयांनी मास्क, ग्लोव्हज् वापरणे कायमस्वरूपी केले.
  • ट्रेनर लांबून शिकवतील.
  •  दिवसभरात 8 ते 9 बॅचेस होतील. त्यामध्ये कर्मचाऱयांसह फक्त उपलब्ध जागेनुसार 15 ते 20 जणच असतील.
  • इतर कर्मचारी आणि सभासदांसाठी मास्क, ग्लोव्हज् वापरणं, त्यांच्या शरीराचं ऑक्सिजन, तापमान तपासूनच जिममध्ये प्रवेश दिला जाईल.
  • सभासदांकरिता या काळात स्वच्छतेकरिता ज्या वस्तू आवश्यक आहेत, त्या ठेवल्या जाणार आहेत.