‘कोरोना’लढ्यात पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसाला नोकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विरोधातील लढ्यात पालिकेच्या अत्यावश्यक सेवेअंतर्गत विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. पालिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे या आधी मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, कोरोना विरोधातील या लढ्यात आतापर्यंत पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. यात धारावीत अन्न वाटपाची जबाबदारी असलेल्या आणि पालिकेच्या जी-उत्तर विभागात करनिर्धारण आणि संकलन खात्यात निरीक्षक पदावर काम करीत असलेल्या अधिकार्‍याचा समावेश आहे. त्यात आता पालिकेतील कामगारांना 100 टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, कोरोना विरोधातील योद्धाचे बलिदान व्यर्थ जाऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका वारसाला पालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

या पदांवर सामावून घेणार

वारसाची शैक्षणिक अहर्ता लक्षात घेत कामगार, कक्ष परिचर, हमाल, आया, कार्यालयीन शिपाई, लिपिक, कनिष्ठ लेखा परीक्षक, लेखासहाय्यक या रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे.