पुढचे 15 – 20 दिवस आपल्या सर्वांसाठी कसोटीचे आहेत – मुख्यमंत्री

3279

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. महाराष्ट्र करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात सध्या आला आहे. पुढचे 15 – 20 दिवस आपल्या सर्वांसाठीच कसोटीचे आहेत. यादरम्यान डगमगून जाऊ नका. या संकटाला धैर्याने सामोरे जा. सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा. कृपा करून घराबाहेर पडू नका. रस्त्यावर गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

जनेतला संबोधित करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, परराज्यातून आलेले काही जण त्यांच्या गावाला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. वाहतूक बंद असल्याने ते जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. परराज्यातून आलेल्यांनी धोकादायक प्रवास करू नये. त्यांनी इथेच थांबावे. राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. कारण हीच आपली संस्कृती आहे. माणूस जगवायचा आहे. त्यासाठी माणुसकी जपायलाच हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

संकट आलंय म्हणून चिंता करत बसू नका. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. संकट घराबाहेर आहे, घरात नाही. त्यामुळे घरातले वातावरण आनंदी राहू द्या, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर काहीसा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला होता. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी झुंबड झाली होती. आता भाजीपाल्याची आवकही सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. अन्नधान्याची दुकानेही आता 24 तास सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या