फ्लिपकार्टचा किराणा पुरवठा पुन्हा सुरू

493

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे घरपोच सेवा पुरवणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनीही आपले काम थांबवले होते. मात्र आता फ्लिपकार्टने आपली सेवा पुन्हा सुरु केली आहे. फ्लिपकार्टने आपली किराणा पुरवठा सेवा सुरु केली आहे. याबाबत माहिती देताना फ्लिपकार्टचे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी रजनीश कुमार म्हणाले की, ‘आम्ही किराणामाल पुरवठा सुरू केला असून आता आमच्या पुरवठा केंद्रांमध्ये काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत किराणामालाच्या मागणीत मोठ वाढ झाली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत.’

ते पुढे म्हणले, स्थानिक प्रशासन व राज्य सरकारांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे आमचे मनोबल निश्चितच उंचावले असून स्थानिक पोलिस यंत्रणा व केंद्र सरकारकडूनही आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे. एकीकडे देश कोविड-19 कोरोना विषाणूशी जोरदार लढा देत असतानाच आमच्या डिलिव्हरी टिम्स व पुरवठा साखळीवर नजर ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यांना जीवनविमा, वैद्यकीय संरक्षण देण्यात येत असून जर एखादा कर्मचारी विषाणू संसर्गाने बाधित झालाच, तर त्यांना आवश्यक ती आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याचीही आमची पूर्ण तयारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या