
हिंगोली जिल्ह्यांमध्ये 14 एप्रिल पर्यंत जमावबंदी व संचार बंदी लागु राहणार असुन आज 31 मार्च रोजी मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे दुकाने, अस्थापना, खाजगी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश 23 मार्च रोजी निर्गमित केले होते. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद करून बाहेरच्या जिल्ह्यातून येण्यासाठी व हिंगोली जिल्ह्यातुन जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. यासोबत संचारबंदी व जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले होते. दरम्यान आज ही मदत संपायला काही तासांचा अवधी शिल्लक असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या, दुकाने, आस्थापना, खाजगी कार्यालय बंद राहणार आहेत. तसेच 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय व अत्यावश्यक कारण वगळता जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही किंवा जिल्ह्यातून बाहेर जाता येणार नाही असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात नागरिकांसाठी 1, 3, 5, 8, 10 व 12 एप्रिल या तारखांना सकाळी 9 ते दुपारी 1 ज्यावेळेस किराणा सामान अथवा फळ भाजीपाला खरेदीसाठी वेळ देण्यात आली असुन या वेळेतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. या कालावधीच्या व्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर विनाकारण पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
































































