मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा 14 एप्रिलपर्यंत लांबणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 14 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 14 एप्रिलनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुसार परीक्षेसंदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा 23 मार्चपासून तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 च्या परीक्षेने सुरू होत होत्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 मार्च 2020 रोजी सर्व विद्यापिठांना पत्र पाठविले. यानुसार 31 मार्च 2020 पर्यंत होणाऱ्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

तसेच 25 मार्च 2020 च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील टाळेबंदीचा (Lockdown) कालावधी 14 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या पदवीस्तरावरील प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 14 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात 14 एप्रिलनंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. तसेच विद्यापीठ परीक्षेबाबत तसेच काही महाविद्यालयाचे लेटरहेड मॉर्फ (Morph) करून महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात चुकीचे संदेश समाजमाध्यमातुन फिरत आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊ नये. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा जरी पुढे गेल्या असतील तरी हे दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे  असून या  कालावधीत  त्यांनी घरात बसून अभ्यास करावा, कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करावा, युट्युब व ऑनलाईनच्या  माध्यमातून अभ्यास करावा,अभ्यासाच्या  काही समस्या असतील  तर आपल्या शिक्षकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्क साधून त्या सोडवाव्यात तर काही वेळ आपला छंद जोपासावा. मिळालेल्या या बहुमूल्य वेळेचा आपण सदुपयोग करावा. – डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ