संकटाशी लढण्याचं बळ मिळालं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जुई गडकरी, अभिनेत्री

लॉकडाऊनदरम्यान आपण जबरदस्ती घरात बसलोय असं सुरुवातीला अनेकांना वाटलं. परंतू हा लॉकडाऊन आपल्या सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीच होता हे नंतर अनेकांच्या लक्षात आलं. या काळात बाहेर पडणं खरंतर दुप्पट धोकादायक होतं. शूटिंगच्या सततच्या धावपळीत मला आरामाची गरज होती. लॉकडाऊनमुळं मला हवाहवासा ब्रेक मिळाला. त्यामुळं घरी बसून राहण्याचं कसलही टेन्शन मला नव्हतं. या सुट्टीत मी मुंबईतल्या घरी एकटीच असले तरी घरातील आठ पर्शियन मांजरींमुळे माझा एकटेपणा दूर झाला. आठपैकी चार लहान पिल्लं असल्याने त्यांचे संगोपन करण्यात वेळ कसा निघून जायचा हे कळतही नव्हतं. उलट त्यांच्यात इतकी बिझी होते की मला जे हवंय ते करायलाही वेळ नसायचा.

या काळात मन रमकण्यासाठी मी प्रॉडक्टिव्ह गोष्टींना प्राधान्य दिलं. झाडं लावली, दररोज एक वेबसिरीज पाहायचे. कुकींग आणि बेकिंग केलं. वेगवेगळे केक बनवून शेजाऱयांना खाऊ घातले. पेंटिंग आणि लिखाण मी आधीपासूनच करते.

मला वाचनाची फारशी आवड नाही पण कर्णनात्मक लिखाण करायला खूप आवडत.स्वत:च युटय़ूब चॅनेल असावं अशी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. ’द स्मॉल टाऊन गर्ल’ नावानं या काळात युटय़ूब चॅनेल सुरू केलं. मला भटकंतीची आणि सोलो ट्रीपची खूप आवड आहे. ट्रीपचे अनुभव, कुकिंग, लाईफस्टाईल असे ब्लॉग या चॅनेलवर पाहायला मिळतील.

लॉकडाऊनचा काळात खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना स्वच्छतेचं महत्त्व सगळ्यांना पटलं. एरव्ही बाहेरून आल्यावर आपण हात, पाय, तोंड धुवतोच पण अधिक काळजी म्हणून आपण आता बाजारातून आणलेल्या वस्तू देखील धुवून वापरतो. दुसरं म्हणजे पेशन्स ठेवायला शिकलो. रोज तेच तेच काय करायचं म्हणून आपल्याला कितीही कंटाळा आला, चिडचिड झाली तरी आपण ती गोष्ट मजबुरीनं का होईना गप्पपणे करतोय. आपण परिस्थिती बदलू शकत नाही परंतू आहे त्या गोष्टीचा स्वीकार करायला कोरोनाच्या संकटानं शिकवलंय.

अजूनही विनाकारण बाहेर पडू नका!

अनलॉक झाल्यानंतर हळूहळू सगळं पूर्ववत होतंय. अजूनही कोरोनाच संकट काही कमी झालेलं नाहीये. उलट ते वाढतंय. त्यामुळं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा. या काळात अनेक काम ऑनलाईन करायला आपण शिकलोय. त्यामुळं शक्यतो महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका. आणखी काही दिवस आपण बाहेर फिरायला किंवा मित्र मैत्रिणींना भेटायला गेलो नाही तर काहीच फरक पडत नाही. ’घरी राहा, सुरक्षित राहा आणि हेल्दी राहा.’