
शिवभोजन थाळी हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आज अनेक गरजूंना केवळ 5 रुपयांत भोजन मिळत आहे. या योजनेला नागरिकांनी देखील उर्त्स्फुत प्रतिसाद दिला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शिवभोजनाच्या माध्यमातून गरजूंना पोटभर जेवण मिळत आहे.
शिव भोजन योजनेअंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी शिवभोजनाचे केंद्र सुरू झालेले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज सरासरी तीन हजार लाभार्थ्यांना भोजन दिले जाते. लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर गरीब आणि गरजू लाभार्थ्यांना याचा अतिशय चांगला फायदा झाला आहे. सहा शिवभोजन केंद्र हे महानगरपालिका हद्दीत संभाजीनगर शहरात असून उर्वरित 12 भोजन केंद्र हे ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कुटुंबामध्ये स्वयंपाक करण्याची सोय नाही आणि ज्यांच्याकडे जेवणाची कुठलीही सोय नाही, अशा अत्यंत गरीब आणि गरजू लोकांना तसेच भटके-विमुक्त आणि विद्यार्थ्यांना शिवभोजनचा अत्यंत लाभ होत आहे. काही शिवभोजन केंद्र हे लाभार्थ्यांकडून कोणतीही रक्कम न घेता त्यांना मोफत भोजन वितरीत करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवभोजन जागेवरच देत असताना सोशल डिस्टन्स राखूनच भोजन दिले जाते.
संभाजीनगर शहरातील गजानन मंदिराजवळील माता वैष्णवी शिवभोजन केंद्र चालकांनी सांगितले की, आम्ही दररोज 200 ते 210 जणांना जेवण देतो. शासनाने 5 रुपये थाळी असा दर निश्चित केलेला असला तरी जे गरजू हे देऊ शकतात त्यांच्याकडूनच आम्ही पैसे घेतो. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांच्याकडून आम्ही पैसे घेत नाहीत कारण समाजाप्रती आम्हीही काही देणे लागतो. समाजाप्रती ही आमची छोटीशी मदत आहे पण यातून नक्कीच आम्हाला समाधान मिळतं.
चिकलठाणा परिसरात बिलाल कुरेशी हे सागर शिवभोजन केंद्र चालवतात ते म्हणतात की, आमच्याकडे सुध्दा गरीब आणि गरजूंची संख्या खूप आहे. समाजासाठी आपण काही करावं या भावनेतून जे पैसे नाही देऊ शकत आम्ही त्यांच्याकडून पैसे घेत नाहीत, कारण आजच्या परिस्थितीत गरीब उपाशी राहू नये हाच आमचा प्रयत्न असल्याचेही बिलाल यांनी सांगितले.
सुरुवातीला शिव भोजन योजना सुरू झाल्यानंतर प्रति व्यक्ती प्रति भोजन दहा रुपये देऊन ही योजना कार्यान्वित झाली होती परंतु covid-19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शिवभोजनची रक्कम कमी करून प्रति व्यक्ती पाच रुपये भोजन अशी केलेली आहे. या शिवभोजन थाळीमध्ये दोन पोळी, एक भाजी, एक वाटी वरणआणि एक वाटी भात लाभार्थ्यांना दिला जातो.यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये मुख्य घाटी हॉस्पिटल ,मिनी घाटी हॉस्पिटल, मुख्य बस स्टॅन्ड इ. ठिकाणी अशा इतर महत्त्वपूर्ण ठिकाणी भोजनाची केंद्रे कार्यान्वित झाली आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजनचे एक पॅकेट तयार करून लाभार्थ्यांना वितरित केले जाते.

































































