कोरोनाचा जागतिक फुटबॉलला फटका, 14 बिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व लॉकडाऊनचा फटका जागतिक फुटबॉलला मोठ्या प्रमाणात बसला आहे. युरोप खंडामध्ये लीगमधील लढतींना सुरुवात झालीय खरी पण क्रीडाप्रेमींना स्टेडियममध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यात आलेली नाही. मार्च ते सप्टेंबर या कालावधीचा विचार करता जागतिक फुटबॉलला 14 बिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, अशी माहिती फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या समितीचे प्रमुख ओली रेन यांच्याकडून बुधवारी देण्यात आली. ही समिती कोरोनामुळे झालेल्या नुकसानावर कशी मात करता येईल यासाठी तयार करण्यात आलेली आहे.

याप्रसंगी ओली रेन यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, कोरोनाचा फटका दक्षिण अमेरिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आशिया व आफ्रिका या खंडातील परिाqस्थतीही चांगली नाही. जगभरातील व्यावसायिक क्लब्सना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. युथ अॅकॅडमीज व लोअर डिव्हिजन क्लब्सचीही चिंता सतावू लागली आहे, असे स्पष्ट मतही पुढे त्यांनी व्यक्त केले.

सध्याच्या परिस्थितीनुसार काम सुरू

कोरोनावर लस आल्यास फायदा होईल. पण कोणत्याही परिस्थितीशी सामना करायला तयार राहायला हवे. पुढल्या वर्षीही कोरोना सुरूच राहिला तर त्याचा सामना करण्याची तयारी असायला हवी. सध्या तरी आताच्या परिस्थितीनुसार आमचे काम सुरू आहे, असे ओली रेन यांनी सांगितले.

150 संलग्न संघटनांनी मागितलीय मदत

कोरोनामुळे जागतिक फुटबॉलवर मोठे संकट कोसळले आहे. फिफाचे 211 सलंग्न सदस्य आहेत. यापैकी 150 सदस्यांनी मदत मागितली आहे. आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये आशिया व आफ्रिका खंडात फुटबॉलचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी मेहनत केली होती. कोरोनामुळे या सर्व बाबींवर पाणी फेरले जाईल याची भीती वाटते, असेही ओली रेन म्हणाले.