कोकण – कोरोना संकटामुळे दशावतारी कलाकारांवर उपासमारीचे संकट

371

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन सुरू आहे. याचा परिणाम कोकणातील दशावतारी कलेवर झाला आहे. कोकणातील पारंपारिक दशावतारी कला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद होत चालली आहे. त्यामुळे ऐन हंगामातच दशावतारी नाटकांचे कार्यक्रम रद्द झाल्याने या कलेवर उपजीविका  कणरा-या दशावतारी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी 800 वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या दशावतारी कलेला जीवंत ठेवण्यासाठी शासनाकडून सर्व कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कुडाळ तहसीलदार रविंद्र नाचणकर यांच्याकडे दशावतारी कलाकारांच्या वतीने गुरूवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. तहसीलदार नाचणकर यांनी याबाबत जीवनावश्यक साहीत्य पुरवठा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सर्वत्र लाॅकडाऊन सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार सर्व धार्मिक, सांस्कृतिक, सामजिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे  ऐन नाटकांच्या हंगामातच कोरोना संकटामुळे दशावतारी कलाकारांना घरी बसावे लागले आहे. शासनाकडून या कलाकारांना जीवनावश्यक साहीत्य तसेच आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कुडाळ तहसीलदार रविंद्र नाचणकर यांची दशावतारी कलाकार व मंडळाचे प्रमुख यांनी भेट घेऊन कलाकारांच्या व्यथा मांडल्या.

यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे कोकणची पारंपारिक असलेली दशावतारी कला आज बंद होत चालली आहे. त्यामुळे या कलेवर उपजीविका करणा-या कलाकारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. तसे पाहता दिवाळीपासून मे अखेर पर्यंत जवळपास 6 ते 7 महिन्यात मिळविलेल्या उत्पन्नावर हे कलाकार आपली उपजीविका करीत असतात. मात्र सध्या कोरोना संकटामुळे या कलाकारांना घरी बसावे लागले आहे. सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. फक्त 3 ते 4 महीने हा व्यवसाय चालला आणि मार्च पासून नाटकांचा हंगाम चालू होणार त्याचवेळी या संकटाने थैमान मांडले. घरी बसून घरात होते ते खाऊन झाले, आता पुढच्या दिवसांत काय खाणार ? अशी चिंता या कलाकारांना पडली आहे. नोकरवर्गाला शासनाने दया दाखवून त्यांचे पगार घरी बसून मिळण्याची सोय केली परंतू दशावतारी नाट्य मंडळांच्या मालक (पथक प्रमुख) यांना ते शक्त नाही. कारण पारंपारिक जत्रोत्सव हे कमी बिदागी मिळणारे कार्यक्रम पहिल्या 3 महिन्यात सादर केले. खरा व्यवसाय हा मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात मागणीप्रमाणे नाट्यप्रयोग सादर केले जातात. त्यांचे मानधन देखील वार्षिक कार्यक्रमांपेक्षा जास्त असते. प्रत्येक कलाकार आगावू रक्कमेची परतफेड कशी करणार? व पुढील वर्षासाठी नवीन कलाकारांसाठी आगावू रक्कम कोठून देणार ? या चिंतेत सर्वच दशावतारी कंपन्यांचे मालक आहेत. त्यामुळे दशावतारी कंपन्यांचे मालक देखील आज कलाकारांना खर्चासाठी रक्कम देऊ शकत नाहीत. पर्यायाने आज दशावतारी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच पथक प्रमुख (मालक) देखील आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळे शासनाकडून या कलाकारांना जीवनावश्यक साहीत्याच्या पुरवठा व्हावा तसेच आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनासोबतच कुडाळ तालुक्यातील 321 दशावतारी कलाकारांची यादीही जोडण्यात आली आहे. यावेळी कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ (नेरूर) चे मालक शिवराम उर्फ सुधीर कलिंगण, चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळ (चेंदवण) चे मालक देवेंद्र नाईक, यक्षिणी दशावतारी नाट्य मंडळ (माणगाव) चे मालक समीर म्हाडेश्वर व कलाकार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या