
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने कठोर उपाययोजना करताना मास्क वापरले नाही तर एक हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणांसह खासगी कार्यालये आणि वाहनांमध्येही मास्क वापरावा लागणार आहे. यामध्ये पालिकेसह पोलिसही आता कारवाई करणार आहेत.
कोरोनामुळे सुरू असलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी पालिकेकडून सर्व प्रकारची आवश्यक खबरदारीही घेतली जात आहे. मात्र नागरिकांकडून नियम मोडून बेजबाबदारपणे वर्तन केल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मास्क वापरत नसलेल्यांवर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
याबाबत आयुक्तांनी परिपत्रक जारी करून संबंधित पालिका अधिकारी आणि पोलिसांना कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारतीय दंड संहितेचे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. पोलीस विभाग, पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकार्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील.
… या ठिकाणी मास्क बंधनकारक
पालिकेच्या निर्देशांनुसार रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. शिवाय कार्यालय किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना मास्क लावावेच लागेल. यामध्ये नागरिक प्रमाणित (स्टँडर्ड) मास्क, तीन स्तरांचे (थ्री प्लाय) मास्क किंवा औषधी दुकानदारांकडे उपलब्ध असलेले साध्या कापडाचे मास्क यासह घरगुती तयार केलेले, निर्जंतुकीकरण करून वारंवार वापरात येणारे मास्क यांचाही उपयोग नागरिक करू शकतात.





























































