
कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले 241 विभाग ‘कंटेनमेंट झोन’ जाहीर करूनही केवळ भाजी विक्री आणि खरेदीसाठी प्रंचड गर्दी होत आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी या 241 ‘कंटेनमेंट झोन’मधील भाजी विक्रीवर पालिकेने बंदी घातली आहे. महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या एका विशेष बैठकीदरम्यान ‘कंटेनमेंट झोन’ परिसरात रस्त्यावरील भाजी विक्री बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘कोरोना कोविड 19’ या आजाराचा मुकाबला करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. यामध्ये पालिका क्षेत्रातील ज्या परिसरात ‘कोरोना कोविड 19’चे रुग्ण आढळून आले आहेत, अशा परिसरांना ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ‘कंटेनमेंट झोन’ परिसरातील नागरिकांना तिथून बाहेर पडण्यावर व बाहेरील नागरिकांना झोन परिसरात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 241 कंटेनमेंट झोन आहेत. या कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दैनंदिन गरजेच्या वस्तू याच परिसरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन व व्यवस्थापन महापालिकेच्या विभाग कार्यालय द्वारे नियमितपणे करण्यात येत आहे. यानुसार आजवर दररोज सकाळी भाजीविक्रेत्यांद्वारे या परिसरात भाजी उपलब्ध करून देण्यात येत असे. मात्र, ही भाजी घेण्यासाठी या परिसरातील अनेक नागरिक एकाच वेळी गर्दी करत असत. याबाबत आवश्यक ते अंतर ठेवण्याची व एकसारखी न येण्याची वारंवार सूचना करून देखील सूचनेचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. यामुुुळे एकाच वेळी हजारो लोक भाजी खरेदी करण्यासाठी येत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते. ही बाब लक्षात घेऊन व वारंवार सूचना देऊन देखील परिसरातील नागरिक काळजी घेत नसल्याची बाबही लक्षात घेऊन नाइलाजाने आजपासून सदर परिसरातील भाजी विक्रेत्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश पाालिका आयुक्तांनी दिले आहेत.


































































