मुंबईकरांना मिळणार मुबलक भाजी! अतिरिक्त भाजी विक्री केंद्रे सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना पुरेशा प्रमाणात भाजी मिळावी यासाठी पालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या तत्वावर अतिरिक्त भाजी विक्री केंद्रे सुरू करण्यासाठी परवाने देण्यात येणार आहेत. मात्र ही भाजी विक्री केंद्रे सुरू करताना गर्दी टाळण्यासाठी दोन विक्रेत्यांमध्ये 20 फुटांचे अंतर तर दोन ग्राहकांमध्ये साडेतीन फुटांचे (एक मीटर) अंतर ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत ‘कोरोना’चा प्रसार वाढत असतानाही नागरिकांची भाजी खरेदीसाठी होणारी झुंबड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘कोरोना’चा प्रसार वाढत असताना, लॉकडाऊन सुरू असताना अनेकजण भाजी खरेदीसाठी नाहक गर्दी करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळेली 283 ठिकाणे ‘प्रतिबंधीत’ क्षेत्र म्हणून जाहीर केली असून या सार्वजनिक ठिकाणची भाजी विक्री बंद केली आहे. मात्र मुंबईकरांना पुरेशा प्रमाणात भाजी मिळावी यासाठी भाजी विक्री केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार भाजी फळे विक्रेत्यांना ठिकाण ठरवून देणे, वेळ ठरवून देणे, नियमांची माहिती देणे व सदर नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करणे; इत्यादी सर्व बाबतचे नियोजन व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभागस्तरीय ‘सहाय्यक आयुक्त’ (वाॅर्ड ऑफिसर) यांच्या स्तरावर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक यांचे सहकार्य घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक आज व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी हे निर्देश दिले असून त्यानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचेही त्यांनी निर्देशीत केले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे व त्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेणे; आदी सर्व बाबींचे नियोजन व व्यवस्थापन हे विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे.