
कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली खासगी कार्यालये अखेर सोमवारपासून सुरू झाली. खासगी ऑफिसमध्ये 10 टक्के उपस्थिती ठेवून आणि सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझेशनची खबरदारी घेत कामकाज सुरू करण्यात आले. मंत्रालयातही 20 टक्के हजेरी असल्यामुळे काही प्रमाणात वर्दळ दिसून आली. दरम्यान, मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल अजूनही बंदच असल्यामुळे ‘बेस्ट’, रिक्षा-टॅक्सीसाठी मात्र कर्मचार्यांची धावाधाव झाली.
राज्यात 8 जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा तिसरा टप्पा सुरू झाला. या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात खासगी, शासकीय कार्यालये सुरू झाली. कार्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारनेही सोशल डिस्टंन्स आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासकीय आणि खासगी कार्यालयांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली. दरम्यान, कार्यालयांचे कामकाम सुरू झाल्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार काही प्रमाणात सुरू झाले आहेत. यामुळे ‘अर्थचक्र’ सुरू होण्यास मदत होणार आहे.
पालिकेत 75 टक्के हजेरी
लॉकडाऊन असला तरी पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे 100 टक्के उपस्थितीसह काम करीत आहेत. तर इतर विभागातही 75 टक्के हजेरीसह काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेत एक लाख चार हजार कर्मचारही आहेत.
‘बेस्ट’, टॅक्सी, रिक्शासाठी रांगा
लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवासाला परवानगी होती. मात्र आजपासून प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्याने बेस्ट, टॅक्सी, रिक्शासाठी ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. यातच प्रवाशांची मर्यादा असल्यामुळे नेहमीप्रमाणे प्रवाशांना कोंबून नेत येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी रांगा वाढल्या होत्या.






























































