कोरोनाच्या भीतीने जेष्ठ नागरिकांना ग्रासले; ज्येष्ठांमध्ये 70 टक्के मृत्यू आजार लपवल्याने

865

मागील दोन ते तीन महिन्यांपासून बातम्या, सोशल मीडिया, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून होत असलेल्या `कोरोना’ च्या माऱ्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना भीतीने ग्रासले आहे. आपल्याला खरंच कोरोना झाला तर रुग्णालयात दाखल व्हायला लागेल. आपल्याकडे कोणी बघणारही नाही अशी भीती त्यांना सतावत असून या भीतीनेच लक्षणे असूनही हे नागरिक उपचाराला घाबरत आहेत. कोरोनामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ज्येष्ठ नागरिकांचे होत असून असे 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण उशिरा उपचारासाठी आल्याने मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

सर्दी, ताप, खोकला ही सर्वसामान्य तापाप्रमाणे कोरोनाच्या आजाराचीही लक्षणे आहेत. पण ही लक्षणे असूनही उपचारासाठी बाहेर पडायला ज्येष्ठ नागरिक घाबरत आहेत. कोरोना रुग्णाचे शवही नातेवाईकांना दाखवत नाहीत. नातेवाईकांनाही अंत्यसंस्कार करण्यास मिळत नाहीत अशा वेगळ्याच भीतीने या ज्येष्ठ नागरिकांना ग्रासले आहे. त्यामुळे घरात काय व्हायचं ते होऊ दे रुग्णालयात जाणार नाही अशी धारणा यांची झाली आहे.

वास येत नाही; कोरोना तर झाला नसेल ना!

आम्हाला वास घेता येत नाही. झोप येत नाही. कोरोना झाला तर नाही ना अशी विचारणाही ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत होती. नेहमी प्रमाणे आपण थर्मामीटरने ताप तपासतो. त्या थर्मामीटरवर कोरोना समजतो की काय, अशी काहींची धारणा झाल्याचे फिजिशियन डॉ. संजय देसाई यांनी सांगितले.

ज्येष्ठांनी कोरोनाविषयी आपली कोणतीही शंका असल्यास 1916 वर फोन करून विचारावे. लक्षणे आढळल्यानंतर त्यांच्या विभागात कुठे क्वॉरंटाइन सेंटर आहेत. ऑक्सिजन बेडची उपलब्धता कुठे आहे याची माहिती या क्रमांकावर आपल्याला मिळू शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील महापालिका कार्यालयात एमओएच आहेत. त्यांचे क्रमांक 1916 वरून घेऊन त्यांचेही मार्गदर्शन घेता येईल, असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

उपचारासाठी येण्यास उशीर होतोय – डॉ. अविनाश सुपे

ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाविषयी भीतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच अन्य गुंतागुंतीचे आजार आधीच असतात. त्यातच हे ज्येष्ठ नागरिक लक्षणे आढळली तरी उपचारासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. मात्र हीच बाब कोरोनासारखा आजार गंभीर रूप धारण करण्यास जबाबदार ठरत आहे. ज्येष्ठांमधील 70 टक्के मृत्यू हे याच कारणामुळे होत आहेत. साधी लक्षणे आढळली तरी त्याबाबत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. एक ते दोन दिवसाचा उशीरही जीवावर बेतू शकतो, त्यामुळे लक्षणांनुसार तत्काळ तपासणी करून उपचारांना सुरुवात होणे अवाश्यक असल्याचे कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या