25 टक्के विद्यार्थी शाळेच्या संपर्कात नाहीत! मुंबई महापालिकेने सुरू केली विशेष मोहीम

509

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिन्यांपासून शाळा बंद असून सध्या ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे 20 ते 25 टक्के विद्यार्थी आजही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालिका शिक्षण विभागाने विशेष मोहीम सुरू केली असून विद्यार्थी-पालकांच्या वर्गनिहाय समित्या स्थापन करणे, बालकमित्र, पालकमित्र यांसारख्या योजनादेखील राबवण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सर्व मुख्याध्यापकांसाठी लेखी सूचना जारी केल्या असून मार्च 2020मध्ये हजेरीपटावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. यात विद्यार्थी, पालकांचे नाव, संपर्क क्रमांक, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या डिजिटल साधनांची माहिती यांचा समावेश आहे. ज्या विद्यार्थी-पालकांकडे ऑनलाईन वर्गासाठी डिजिटल साधने उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी पालिका शिक्षण विभाग विविध योजना राबवत आहे.

प्रत्येक वर्गनिहाय समिती

प्रत्येक वर्गातील दोन पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, एनजीओ सदस्य, मुख्याध्यापक, शाळा निरीक्षक यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती वर्गनिहाय असणार असून त्यांचा एक व्हाट्सऍप ग्रुपदेखील तयार करण्यात येणार आहे. या ग्रुपवर शाळेच्या संपर्कात नसणाऱया विद्यार्थ्यांची माहिती, दररोज शिकवला जाणारा अभ्यास, वर्कशीट शेअर केला जाईल. प्रत्येक ग्रुपची 15 दिवसांनंतर व्हर्च्युअल सभा घेतली जाणार आहे.

बालकमित्र

डिजिटल माध्यमे उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांनी जवळपासच्या डिजिटल माध्यमे उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वतःबरोबर ऑनलाईन वर्गात सहभागी करून घ्यावे.

पालकमित्र

पालकांनी एकमेकांशी वर्कशीटची देवाणघेवाण करावी, ज्या पालकांना डिजिटल शिक्षणाचे ज्ञान नाही त्यांची इतर पालकांनी मदत करावी.

या कारणांमुळे विद्यार्थी ऑनलाईन नाहीत

  • उपजीविकेचे साधन नाही; मूळ गावी परतले.
  • पालकांकडे ऍण्ड्रॉईड फोन नाहीत.
  • नेटपॅक भरण्यासाठी पैसे नाहीत.
  • पालकांकडे फोन नसल्याने शाळांकडे संपर्क क्रमांक नाहीत.
आपली प्रतिक्रिया द्या