
गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठका पुन्हा 21 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या बैठकीत कोविड संबंधातील विषयांसह विविध प्रकल्प, विकासकामे, प्रशासकीय कामे, पदोन्नती आदी विषयांचे तब्बल 600 प्रस्ताव प्रशासनाकडून मांडले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या अनेक प्रकल्प-विकासकामांचा मार्ग मोकळा होणार असून प्रशासकीय कामाचा मार्गही मोकळा होणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून विविध समित्यांच्या बैठका बंद आहेत. या काळात प्रशासनाकडून कोरानाशी लढा देण्याचे महत्त्वाचे काम अहोरात्र सुरू आहे. मात्र स्थायी समितीच्या बैठका झाल्या नसल्याने विकासाची अनेक कामे खोळबंली आहेत. यातच आता पालिकेच्या लढ्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आणि राज्य सरकारच्या निर्देशानंतर नुकत्याच विविध वैधानिक समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यानंतर आता या समित्यांच्या बैठकाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये 21 ऑक्टोबर रोजी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत 600 प्रस्ताव मांडले जाणार आहेत.
भाजपचा विरोध
स्थायी समितीच्या बैठकीत एकाच वेळी 550 ते 600 प्रस्ताव मांडण्यात आल्यास संबंधित विषयांवर साधकबाधक चर्चा करणे शक्य होणार नसल्याचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. कोविड काळात स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय झालेल्या साधनसामग्रीच्या खरेदीबाबत प्रभाकर शिंदे यांनी संशयही व्यक्त केला आहे. याबाबत भाजपने आंदोलने करूनही प्रशासनाने उत्तर न देता संबंधित प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी मांडण्यात आल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. शिवाय आगामी सभेतील प्रस्तावांच्या क्रमवारीबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सुधारात्मक कार्यवाही करावी अशा मागणीचे पत्र प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना दिले आहे.
भाजपने नौटंकी बंद करावी – शिवसेना
मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना पालिकेच्या माध्यमातून विकासकामे करीत असताना भाजप मात्र नाहक विरोध करून नेहमीच राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आला आहे. मात्र त्यांची ही नौटंकी नेमहीच अंगलट आली आहे. स्थायी समितीत नेहमीच प्रत्येक प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विरोधकांसह प्रत्येक पक्षाला आवश्यक संधी देण्यात येते. त्यामुळे आगामी सभेतही अशाच प्रकारे नियमानुसारच स्थायी समितीचे कामकाम होईल, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली असून भाजपने नौटंकी बंद करावी असा टोलाही लगावला आहे.


























































