
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे विषाणू सापडले आहेत. केरळ आणि तेलंगणामध्येही त्याच स्वरूपाचे विषाणू आढळले आहेत. केंद्र सरकारकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. मात्र या राज्यांमध्ये वाढणाऱया रुग्णसंख्येला हे नवे विषाणू जबाबदार आहेत असे सध्यातरी सांगता येणार नाही असे केंद्र सरकारने म्हटले आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगणामध्ये कोविडचे ‘एन 440 के’ आणि ‘ई 484 के’ स्वरूपाचे नवे विषाणू आढळले आहेत. देशातील 187 नागरिकांना ब्रिटिश कोरोनाची लागण, तर सहा रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील कोविडचे विषाणू आढळले आहेत. एका रुग्णामध्ये ब्राझील कोविडचे विषाणू आढळले आहेत.
‘आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये वाढणाऱया रुग्णांचा कोविडच्या नव्या विषाणूंशी थेट संबंध नाही असे स्पष्ट केले. हे दोन विषाणू केवळ आपल्याच देशात नाहीत तर परदेशातही आढळले होते. ‘ई 484 क्यू’ हा कोविड विषाणूचा प्रकार महाराष्ट्रात गेल्या मार्च आणि जुलैमध्येही आढळला होता.
मंगळवारची रुग्णसंख्या
- राज्य – 6218
- मुंबई – 643
- मृत्यू – 51
- मृत्य – 03
सलग दुसऱया दिवशी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. सोमवारी 761 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याआधी रविवारी 921 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. महाराष्ट्रात मात्र कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय.


































































