मार्च आला, कोरोना पुन्हा वाढला… गेल्या 24 तासात आढळले 22 हजाराहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

गेल्या वर्षी हिंदुस्थानात मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादूर्भाव वेगानं वाढू लागला होता. यंदाही जानेवारीपर्यंत कमी होत गेलेली कोरोनाग्रस्तांची संख्या अचानकपणे वेगानं वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 हजाराहून अधिक वाढल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये रुग्ण संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात संध्याकाळी सात ते सकाळी सहा पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस प्रशासन, आरोग्य विभागही सतर्क आहे.

दरम्यान, एका बाजूला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असला तरी राज्यासह देशभरात लसीकरण मोहिमेने देखील जोर पकडला आहे. आतापर्यंत देशातील 2.5 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे, ज्यामध्ये आरोग्य कर्मचारी, कोरोनो योद्धे, गंभीर आजारांनी त्रस्त व्यक्ती आणि 60 वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे.

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडल्याने देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही 1.90 लाखांवर पोहोचली आहे. 24 तासात 22 हजाराहून अधिक रुग्ण आढळण्याची अडीच महिन्यांनी देशातील ही पहिली वेळ आहे. तर 15 हजाराहून अधिक रुग्ण वाढण्याचा हा सलग आठवा दिवस आहे. गेल्या 24 तासात 18,100 जण कोरोनामुक्त झाले आहेत.