
देशभरात गेल्या काही दिवसांपूर्वी कमी होत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाने देशाची चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासात देशात 44,230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 50 रुग्ण केरळमध्ये आहेत. सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. केरळ, महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 80 टक्के नवे रुग्ण आढळले आहेत.
कोरोनामुळे गेल्या 24 तासात 555 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 128 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22,064, महाराष्ट्रात 7,242, आंध्र प्रदेशात 2,107, कर्नाटकात 2,052 तर तामिळनाडूमध्ये 1,859 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के आहे. गेल्या 24 तासात 42,360 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या कमी आहे. कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,07,43,972 झाली आहे. तर 4,05,155 सक्रिय रुग्ण आहेत.
राजस्थानातील 33 जिल्ह्यांपैकी 27 जिल्ह्यात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तसेच गेल्या 24 तासात कोरोनाने एकही मृत्यू झालेला नाही. तसेच सक्रीय रुग्णांची संख्या 259 आहे. राजस्थानात गुरुवारी 17 नवे रुग्ण आढळले होते.त्यामुळे कोरोनाबाबत राजस्थानातील आकडेवारी दिलासादायक आहे.




























































