जालन्यात लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

द्राक्षांच्या लागवडीची नोंद 7/12 वर करण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घेताना कडवंची सजाचे तलाठी अनिल चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई सोमवारी जालन्यातील दिपक हॉस्पीटलसमोरील इमारतीच्या कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराच्या भावाची वडगांव शिवारात गट क्रमांक 238 मध्ये शेती असून, त्यामध्ये द्राक्षांची लागवड केली आहे. त्याची 7/12 वर नोंद करण्यासाठी विनंती तक्रारदारांनी तलाठी चव्हाण यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. तडजोडीअंती एक हजार रूपयांची लाच घेण्यास तलाठी तयार झाले. दिपक हॉस्पीटल समोरील त्यांच्याच कार्यालयात सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजाराची लाच घेताना तलाठी चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले.