
सामना प्रतिनिधी । पुणे
खडकवासला कालव्याची दुरुस्ती हा गेल्या पंधरा-वीस वर्षांतील जलसंपदा विभागाचा सर्वाधिक खाबुगिरीचा विषय ठरला आहे. तीनशे ते चारशे कोटी रुपये खर्च होऊनदेखील हा कालवा ढिसूळ आणि गळतीने जर्जर आहे. काही विशिष्ट ठेकेदारांना या कालवा दुरुस्तीची कंत्राटे ठरावीक काळात दिली गेली. दुरुस्ती होऊनही गळती कायम राहिली; पैसा मात्र जिरवला गेला.
धरणातून कालव्यात १२०० क्युसेक्सने पाणी सोडले तर प्रत्यक्षात इंदापुरातील टोकाला २५० क्युसेक्सने पाणी मिळते, ही वस्तुस्थिती आहे. कोट्यवधी रुपये खर्चून दुरुस्ती सोडा; साधी झाडाझुडूपांची साफसफाईदेखील होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण कालवा आणि त्याच्या वितरिका २४३ कि.मी. अंतराच्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात मुख्य कालवा हा १८० कि.मी. अंतराचा आहे. खडकवासला ते पर्वती हे अंतर १८ कि.मी. आहे.
खडकवासला उजव्या कालव्यातील दुरुस्ती आणि गाळ काढण्याची यापूर्वीची मोठी कामे परराज्यांतील कंत्राटदारांना दिली गेली. मात्र, कालव्याच्या दुरुस्तीची कामे अर्धवट राहिली. आघाडी सरकारच्या काळात या कामावर सर्वाधिक खर्च झाला. या कामातील गैरप्रकार आणि चौकशांची प्रकरणे दडपण्यात आली. प्रत्यक्षात कारवाई न झाल्याने अधिकारी आणि कंत्राटदारांची बेफिकीरी वाढली. खडकवासला कालवाफुटीच्या छोट्यामोठ्या २१ घटना आजपर्यंत घडल्या आहेत. ही ठिकाणे, पर्वती जलकेंद्र ते खडकवासला धरण यादरम्यान सहा ठिकाणी फुटीची नोंद आहे. विठ्ठलवाडी, हिंगणे या ठिकाणी कालवा फुटला होता; परंतु तो ओढ्यालगत असल्याने तेव्हा शेतीपिके आणि काही घरांचे नुकसान झाले होते. मात्र, आता दांडेकर पुलाजवळची घटना सर्वांत मोठी आणि दाट मानवीवस्तीमधील आहे. तीन वर्षांपूर्वी इंदापूर आणि दौंड तालुक्यात कालवा फुटला होता. त्यामध्ये शेती वाहून गेली होती. काही विहिरींचे नुकसान झाले होते.
पुणे शहराच्या वस्त्यांमधून जाणाऱ्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी वेळ मिळत नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लष्कर केंद्राला कालव्यातून २५० ते ३०० क्युसेक्स पाणी दररोज दिले जाते. कालवा बंद ठेवला तर पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासतो. म्हणून काम करण्यात अडचण असल्याचे जलसंपदा खात्याचे म्हणणे आहे. परंतु, शहरासाठी बंद पाणीयोजना झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. कालव्याची दुरुस्ती, डागडुजी आणि देखभालीकडे होणारे दुर्लक्ष हेच कालवाफुटीला कारणीभूत ठरले आहे.
यंदाच्या हंगामासाठी खडकवासला प्रकल्पातील पाणी नियोजनासाठी असणारी कालवा समितीची बैठक अद्याप झाली नाही. उद्या होणार होती, ती या घटनेमुळे पुढे ढकलण्यात आली. धरणे भरल्यामुळे सध्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. हे नियोजनबाह्य पाणी आहे. ते सोडण्याआधी समितीमध्ये निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, इंदापूर, दौंडमध्ये पाऊस नसल्याने तेथील आमदारांनी पाणी सोडण्याची मागणी केली; तसेच तलाव, तळी भरून घेण्यासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. हे सगळे नियमात आहे का? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.





























































