
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणूक वॉर्ड रचनेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत भाजपच्या माजी नगरसेवकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
कुळगाव-बदलापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी वॉर्ड सीमांकनाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून 18 ऑगस्ट रोजी नगर परिषदेने वॉर्ड रचनेबाबत मसुदा तयार केला, मात्र या वॉर्ड रचनेत भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत भाजप नगरसेवक किरण भोईर यांनी ऍड. अजिंक्य गायकवाड यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
वॉर्ड रचना करताना गोपनियतेचा भंग झाला असून वॉर्ड रचनेत सहभागी झालेल्या नगर परिषदेच्या एका अधिकाऱयाविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी प्रलंबित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अंतिम सीमांकनाबाबतची अधिसूचना रद्द करण्यात यावी तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.