
सामना प्रतिनिधी । पुणे
कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लांबविल्याप्रकरणी सायबर क्राइम सेलने नांदेड, संभाजीनगर येथून आणखी दोघांना अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दोघांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला.
शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. संभाजीनगर), महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी यापूर्वी फहिम मेहफूज शेख (वय २७, रा. भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी इतर पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास सुभाष गोखले (वय ५३) यांनी फिर्याद दिली आहे.
११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत कॉसमॉस बँकेचे सव्र्हर हॅक करण्यात आले होते. या हल्यामध्ये तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याचे उघड झाले होते. यामध्ये तब्बल ४१३ बनावट डेबिट कार्डांच्या माध्यमातून २ हजार ८४९ व्यवहार करण्यात आले. १२ हजार व्यवहार हे व्हिसी कार्डद्वारे करण्यात आले असून, त्यामाध्यमातून ७८ कोटी आणि स्विफ्ट व्यवहाराच्या माध्यमातून १३ कोटी ९२ लाख रुपये बँकेतून लुटून नेण्यात आले. मुंबई, इंदूर, कोल्हापूर या ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींची छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत, तसेच मोबाइलच्या माहितीवरून ते भिवंडी, संभाजीनगर, हैदराबाद, गोवा, विरार येथील असल्याचे स्पष्ट झाले.
बँकेचे सव्र्हर हॅक होणार असल्याची माहिती मिळाल्याने आरोपींनी कट करून हा गुन्हा केला. वेगवेगळ्या भागातील आरोपी हे कोल्हापूर येथे आले. त्यानंतर त्यांनी ९५ क्लोन एटीएम कार्डचा वापर करून कोल्हापूर येथील वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून रक्कम काढली. याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या शेख, खान यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जब्बार आणि राठोड यांना अटक केली. दरम्यान, जब्बार, राठोड यांना न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी त्यांना कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.





























































