कोस्टल रोडच्या महाबोगद्याचे काम 7 जानेवारीपासून सुरू होणार, मावळा करणार काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोस्टल रोडच्या मार्गातील दोन महाबोगदे खोदण्याचे काम 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणले गेलेले देशातील सर्वात मोठे मावळा टनेल बोअरिंग मशिन वापरले जाणार आहे. बोगद्यांचे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

कोस्टल रोडचा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंक असा पहिला टप्पा पालिका तयार करत असून यासाठी पालिका 12721 कोटी रुपये खर्च करणार आहे. आतापर्यंत 1281 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामात 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. अजून 102 एकर भराव टाकला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या कामात प्रिय दर्शनीपार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2.07 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. हे काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या बोगद्यासाठी देशातील सर्वात मोठी टनेल बोअरिंग मशिन वापरली जाणार आहे.

चीनमधून आणलेल्या मशिनचा व्यास 39.6 फुट असून लांबी 400 मीटर आहे. कोस्टल रोडचे काम 17 टक्के पूर्ण झाले असून जुलै 2023 काम पूर्ण होऊन या मार्गावर वाहने सुसाट धावतील, कोस्टल रोडमुळे मुंबईची वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार असल्याचे चहल यांनी सांगितले.

मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा एकूण 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळे प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान 9. 98 किमी लांबीचा हा मार्ग असणार आहे. तसेच पार्किंगची सोय असेल.