कापसाला बोंडअळी, उसाला हुमणी किडीची बाधा, बाधित उसाचे तातडीने गाळप करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कापसाला बोंडअळीची बाधा होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाच आता ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात हुमणी किडीने हल्लाबोल केला आहे. हुमणी प्रतिबंधासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. हुमणीबाधित उसाचे गाळप तातडीने करण्याचा सल्लादेखील कृषी आयुक्तालयाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

अडीच लाख हेक्टर बाधीत
राज्यात सध्या ११ लाख हेक्टरवर ऊस उभा आहे, त्यापैकी मोठ्या प्रमाणात उसावर हुमणीचे आक्रमण झाले आहे, असे कृषी खात्यानेच स्पष्ट केले आहे. राज्यात अकरा लाख हेक्टर क्षेत्रावर उस असून, सुमारे दोन ते अडीच लाख हेक्टर क्षेत्र हुमणीमुळे बाधीत झाल्याचे कृषी खात्याने स्पष्ट केले. संभाजीनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातही सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यशाळेद्वारे जागृती
कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, विस्तार संचालक विजयकुमार घावटे, उपसंचालक सुभाष घाडगे यांनी मात्र एकत्रितपणे राज्यातील हुमणीबाधीत क्षेत्राचा आढावा घेऊन, राज्यस्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून प्रबोधनदेखील करण्यात आले. हुमणी रोखण्यासाठी कोणत्या विभागाने काय उपाययोजना करायच्या, हे स्पष्ट करून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हुमणी रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न
साखर आयुक्तालय, कृषी आयुक्तालय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच हुमणीतज्ज्ञांची पुण्यात एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. यात हुमणीला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले आहे. याशिवाय रासायनिक नियंत्रणाऐवजी जैविक पद्धतीचा वापर करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. या सर्व नियोजनात साखर आयुक्तालय कितपत पुढाकार घेते, यावर कृती आराखड्याचे यश अवलंबून राहील, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.