बीडमध्ये कापूस गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचा कापूस भस्मसात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी, बीड

बीड शहरातील कुर्ला रोडवर बाजार समितीच्या भागात असणाऱ्या शासकीय गोदामाला भीषण आग लागली असून कोट्यवधी रुपयांच्या कापसाच्या गठाणी भस्मसात झाल्या आहेत. आठ तासांपासून आगीची धग कायम आहे. अग्निशमन दलाच्या २० गाड्या आग विझवण्याचे काम करत असून आगीचे कारण समजू शकलेले नाही.

कापसाचे व्यापारी आणि जिनिग प्रेसिंगचे मालक राजू संचेती यांनी गठाणी ठेवलेल्या शासकीय गोदामाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागलेल्या गोदामात कोट्यवधींच्या कापसाच्या गठाणी ठेवण्यात आल्या होत्या. या आगीत त्या भस्मसात झाल्या आहेत.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण अद्यापही आग आटोक्यात येऊ शकलेली नाही. त्यामुळे नुकसानाचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.