कोरोनाच्या समुपदेशनात ‘सेवाव्रती’ बजावतायत महत्त्वपूर्ण भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>संतोष आंधळे

कोरोनाच्या रुग्णांना सध्या वैद्यकीय उपचारांपेक्षा त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गरज असते मानसिक समुपदेशनाची. या आजाराभोवती असलेली भीती आणि त्याबाबत असलेले गैरसमज यामुळेच अनेकवेळा मानसिक खच्चीकरण होते. लॉकडाऊन, सक्तीची  विश्रांती  या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या मनात चिडचिड निर्माण झाली असून उगाच मानसिक ताण वाढत असल्याची जाणीव अनेकांना होत आहे. त्यात रुग्णालय म्हटले की, रुग्णांपेक्षा त्याचे नातेवाईकच जास्त घाबरतात. या अशा काळात रुग्णांचे आणि नातेवाईकांचे  मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे काम संभाजीनगर येथील हेडगेवार रुग्णालयात ‘सेवाव्रती ’  या उपक्रमाअंतर्गत सध्या सुरू आहे. यामध्ये 75 व्यक्ती कोणताही पैसे न घेता या रुग्णालयात दररोज 4 तास देऊन रुग्णाचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

या आजारात काही मृत्यू होतात हे वास्तव नाकारून चालणार नाही. मात्र त्याचे प्रमाण कमी कसे करता येईल यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ काम करीत आहेत. नागरिकांनी या लढाईला धीराने सामोरे जाण्याची गरज आहे. अनेक वेळा नकारात्मक बातम्या आणि माहिती सतत कानावर आदळल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे मानसोपचारतज्ञ सांगतात.  या अशा परिस्थितीत सकारात्मक संवादाची सध्याच्या  या काळात गरज असून या आजाराबाबत जनजागृती करणे हे मुख्य काम सध्या या उपक्रमाअंतर्गत सुरू आहे.  या उपक्रमात सेवा देणारे नागरिक रुग्णालयातील कामाची जबाबदारी स्वीकारत असतात. प्रशासकीय कामात हातभार लावणे, रुग्णालयातील विविध रुग्णउपयोगी सेवा देणे प्रामुख्याने ही कामे ही नागरिक करत असतात. लसीकरणासंदर्भातील शास्त्रीय माहिती लोकांना देऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे कामही येथे केले जाते.

या उपक्रमात  पुरुषांसह महिलांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे. यामध्ये कुठलाही पैशाचा व्यवहार नाही. संपूर्ण सेवा ही मोफत आहे. संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय हे 32 वर्षे जुने असून या रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. 300 खाटांच्या या रुग्णालयात सध्या 160 कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. तर दररोज 1000 पेक्षा रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात.

  • ‘ज्या व्यक्तींना सामाजिक भान आहे, सेवा करण्याची इच्छा आहे असे ज्येष्ठ नागरिक या उपक्रमात सहभागी होत असतात. या उपक्रमात सहभागी होणाऱया व्यक्तीचे वय किमान 60 ते 65 दरम्यान आहे. कोणतीही व्यक्ती ही सेवा देण्यासाठी सहभागी होऊ शकते. त्यासाठी त्या व्यक्तीने किमान 4 तास या सेवेसाठी देणे अपेक्षित आहे. त्या व्यक्तीचे स्वतŠचे स्वास्थ्य चांगले असणे अपेक्षित आहे.
  • या नागरिकांची इथे आम्ही रीतसर नोंदणी करतो. ते रुग्णालयात जेव्हा सेवा देण्यासाठी येतात तेव्हा त्याची ओळख पटावी म्हणून एक जॅकेट दिले आहे. त्यांना प्रत्येकाला त्यांची कामे नेमून दिलेली आहेत. त्याची नोंद रुग्णालय प्रशासनाकडे असते. त्याचा हजेरी पटही येथे आहे. कोरोनाच्या काळात या सेवा देणाऱया नागरिकाचे काम बहुमूल्य आहे.
  • रुग्णांच्या नातेवाईकांची समज काढण्यापासून ते रुग्ण दाखल होईपर्यंत त्यांना मदत केलीच जाते. मात्र त्यांना रुग्ण रुग्णालयात असताना त्यांना माहिती मिळण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याचीही  काळजी हे नागरिक घेत असतात.’ असे डॉ. अनंत पांढरे सांगतात. ते रुग्णालयात वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.