दत्तक घेतलेल्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण; हातही मोडला, विकृत दाम्पत्याला अटक

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दत्तक घेतलेल्या सात आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यांना एका दाम्पत्याने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना नालासोपारा येथे उघडकीस आली आहे. या मारहाणीत एका मुलाचा हात फॅक्चर झाला आहे. शेजाऱ्यांनी या प्रकाराची माहिती चाईल्ड हेल्पलाइनला दिल्यानंतर या मुलांची सुटका करण्यात आली असून आचोळे पोलिसांनी विकृत दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वच्या अग्रवाल नगरी येथील वीणा सरस्वती इमारतीमध्ये सचिन पोरे आणि कविता पोरे हे दाम्पत्य राहतात. सचिन पोरे खासगी कंपनीत काम करतो तर त्याची पत्नी कविता ही गृहिणी आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी अभिषेक (सात वर्ष आठ महिने) आणि राजेश (तीन वर्ष आठ महिने) या मुलांना दत्तक घेतले होते. मात्र ते या दोन्ही मुलांना नेहमीच बेदम मारहाण करत असायचे. जिवाच्या आकांताने ही मुले जोरजोरात रडायची. त्यांचा हा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी विचारणा केली असता पोरे दाम्पत्यांनी हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, तुम्ही यात पडायचे नाही अशी मुजोरी करायचे, परंतु दररोज रात्री मुलांच्या रडण्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा आवाज येत असल्याने शेजारी अस्वस्थ झाले होते. सततच्या छळछावणीमुळे संतप्त झालेल्या शेजाऱ्यांनी पालघर जिल्हा महिला बालविकास आघाडीच्या 1098 या हेल्पलाइनवर संपर्क करून माहिती दिली.

हातापायांवर ओरखडे
तक्रारीची गंभीर दखल घेत चाईल्ड हेल्पलाइन विभागाच्या पथकाने पोरे दाम्पत्याच्या घरी धडक दिली असता मुले जखमी अवस्थेत आढळली. मुले अभ्यास करत नाहीत म्हणून मारहाण केल्याचे त्यांनी कबुली दिली. पीडित मुलांच्या हातापायांवर नखांचे ओरखडे होते. हात सुजलेला होता. सात वर्षांच्या अभिषेकचा हात फॅक्चर झाला होता. याप्रकरणी जिल्हा बालविकास विभागाचे पर्यवेक्षक राजेश भालिंगे यांनी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोरे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.