
सामना ऑनलाईन । हैदराबाद
आई वडिलांचा लग्नाला विरोध असल्याने एका प्रेमी युगुलाने मंदीराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना हैदराबाद येथे घडली आहे. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. ते दोघेही लग्न करण्यासाठी मंदीरात आले होते असे समजते.
या प्रेमी युगुलाचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघेही अलवल या गावचे रहिवासी होते. त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचे होते. मात्र मुलगी सवर्ण व मुलगा खालच्या जातीतील असल्याने मुलीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे ते दोघे २८ सप्टेंबरला घरातून पळून गेले होते. काही दिवसांपासून ते हैदराबादला राहत होते. मात्र मुलीचे पालक त्यांना शोधत हैदराबादला आले होते. त्यामुळे लग्न करण्यासाठी ते हैदराबादमधील एका मंदीरात आले होते. मात्र आईवडील मंदीरात पोहचत असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी मंदीराच्या दुसऱ्या माळ्यावर जात तेथील छतावरून मागच्या बाजूच्या दरीत उडी मारली.


























































