
आपला विवाह हा हिंदू विवाहांतर्गत नव्हे तर शीख विवाह कायद्यानुसार नोंदला जावा, अशी याचिका एका दांपत्याने उच्च न्यायालयाकडे केली आहे. देशातील दहा राज्यांमध्ये अशा प्रकारे नोंद होत असताना महाराष्ट्रानेही तो मान्य करावा, अशी मागणी देखील दांपत्याने याचिकेतून केली आहे.
ही याचिका व्यवसायाने वकील असलेल्या अमृतपाल सिंग खालसा आणि त्यांची पत्नी सतविंदर कौर यांनी दाखल केली आहे. खालसा यांनी गेल्या वर्षी संभाजीनगर येथील गुरुद्वाऱ्यात आनंद कारज पद्धतीने विवाह केला होता आणि त्याच विवाहांतर्गत त्यांना आपल्या विवाहाची नोंदणी हवी आहे. तशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. या याचिकेनुसार, महाराष्ट्रात शिखांसाठी आनंद विवाह अधिनियम असूनही त्यांना हिंदू विवाह अधिनियमांतर्गत आपला विवाह नोंदवावा लागतो. आनंद विवाह अधिनियम 1909 अंतर्गत महाराष्ट्रात शीख विवाहांची नोंदणी केली न जाणं हा राज्यघटनेच्या चौदाव्या कलमाचा भंग आहे. तसंच संविधानाच्या कलम 25 आणि 26 अन्वये संरक्षण मिळूनही शीख धर्माचं पालन त्यांना करता येत नाही. हे देखील धार्मिक स्वातंत्र्याच्या आड येत आहे. शिखांसाठी वेगळा कायदा असूनही आम्हाला हिंदू विवाह अधिनियमांतर्गत विवाह नोंदणी करावी लागते. जेव्हा परदेशात जायची वेळ येते तेव्हा आचरलेला धर्म शीख आणि विवाहाचं प्रमाणपत्र हिंदू विवाह कायद्यानुसार असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशातील दहा राज्यांमध्ये आनंद विवाह अधिनियम लागू करण्यात आला आहे. मग महाराष्ट्रात तो का लागू नाही, अशी विचारणा देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.
काय आहे आनंद कारज विवाह?
शीख धर्मातील विवाह पद्धतीला आनंद कारज म्हटलं जातं. विवाहाची ही पद्धत हिंदू विवाहापेक्षा वेगळी आहे. हिंदू धर्मात अग्निभोवती सात फेरे घेणं हा विवाहातील एक मुख्य विधी असतो. तर आनंद कारजमध्ये जोडपं एकमेकांच्या साथीने गुरूग्रंथसाहेबाच्या प्रतीला चार प्रदक्षिणा घालून हा विवाह पूर्ण होतो.
































































