
झारखंडच्या जमतारा जिल्ह्यात अनैतिक संबंधांमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी रात्री एका प्रेमी युगुलाला रंगेहात पकडल्याने त्यांना विजेच्या खांबावर बांधून मारहाण करण्यात आली आहे.
जमतारा जिल्ह्यातील कुंडहित तालुक्यातल्या शंकरपूर गावात ही घटना घडली. बनकाटी गावातल्या एका 30 वर्षीय तरुणाचे शंकरपूर गावातील विधवेशी अनैतिक संबंध होते. बराच काळ याची माहिती कुणालाही नव्हती. पण, मंगळवारी या घटनेची बराच काळ कुणकुण असलेली तरुणाची पत्नी शंकरपूर गावात येऊन थडकली. तिने रंगेहात त्याला आणि सदर विधवा महिलेला पकडलं. या प्रकाराचा जाब विचारताच संतापलेल्या तरुणाने आपल्या बायकोला मारहाण करायला सुरुवात केली.
या दरम्यान तरुणाचे वडीलही या गावात येऊन पोहोचले. त्यांनी तरुणाच्या पत्नीला सोडवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. पण, या सगळ्या तमाशामुळे ग्रामस्थांना या प्रकाराची माहिती कळली. महिलेला झालेली मारहाण पाहून ग्रामस्थ संतापले. त्यांनी या तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला पकडलं. त्या दोघांनाही रात्रभर एका विजेच्या खांबाला बांधून ठेवण्यात आलं. त्यांना मारहाणही झाली.
या प्रकाराची माहिती कळताच पोलिसांनी शंकरपूर गावात धाव घेतली. त्यांनी या युगुलाला सोडण्याची विनंती केली. पण, ग्रामस्थ त्यांना सोडायला तयार झाले नाहीत. जोपर्यंत गावच्या पंचायतीत याचा योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत या दोघांनाही सोडण्यात येणार नाही, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.



























































