
वाई तालुक्यातील कणूर येथे शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याने अपत्य होत नसल्याच्या कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तानाजी लक्ष्मण राजपुरे (वय 40) व पत्नी पूजा तानाजी राजपुरे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
राजपुरे दाम्पत्याचे लग्न होऊन सुमारे 10 ते 12 वर्षे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मूल होत नसल्याने हे दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होते. त्यातूनच या दाम्पत्याने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली.
तानाजी हे काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करत होते. त्यानंतर ते गावी आले. शेती करू लागले. या दाम्पत्याच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची फिर्याद पोलीस पाटील सूरज जठार यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली. याबाबत वाई पोलीस ठाण्याचे एस. जे. मुजावर व के. ए. आवळे अधिक तपास करीत आहेत.
































































