पश्चिम रेल्वे कुलींना देणार सौजन्याचे धडे! प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कुली नंबर वन उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे टर्मिनस म्हटले की, आपल्या डोळय़ासमोर उभे राहतात ते दंडावर पितळी बिल्ला बांधलेले लाल कपडय़ातील कुली. लांब पल्ल्याच्या ट्रेनने आलेल्या प्रवाशांचे सामान वाहून नेणाऱया या कुलींबाबत प्रत्येकाचा चांगला-वाईट अनुभव असतो. त्या पार्श्वभूमीवर कुलींनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, त्यांना चांगली सेवा द्यावी, अवाचेसवा पैसे घेऊ नयेत म्हणून पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने आता कुलींना सौजन्याचे आणि सतर्कतेचे धडे देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कुली नंबर वन उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी चांगली सेवा मिळू शकणार असून रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकारांनाही आळा घालणे शक्य होणार आहे.

रेल्वे प्रवाशांना कुलींकडून सुमार दर्जाची सेवा मिळत असून सामान वाहून नेण्यासाठी अवाचेसवा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी अनेक प्रवासी करतात. तसेच प्रवाशांशी बोलतानाही उद्धटपणे बोलले जाते. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या कुलींना प्रवाशांशी कसे बोलावे, आपल्या कामाप्रति आस्था असावे, काम करताना नियमाचे पालन करावे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच आपल्या कामाचे प्रवाशांकडून डिजिटल मोडने पैसे कसे स्वीकारावेत याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी याचेही धडे दिले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कामाचे मूल्यमापन होणार
कुलीने दिलेल्या सेवेबाबत रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून फीडबॅक फॉर्म भरून घेत आहे. त्यामध्ये कुलीने कशाप्रकारे सेवा दिली, किती पैसे घेतले, बोलण्याची पद्धत काय होती, दिलेल्या सेवेबाबत समाधानी आहात का ही माहिती नोंदली जाणार आहे. त्याचे शेवटी मूल्यमापन केले जाणार असून सर्वोत्कृष्ट सेवा देणाऱया कुलीचा कुली नंबर वन म्हणून रेल्वेकडून गौरव केला जाणार आहे.