लहान मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू, पाटणा एम्समध्ये दिला पहिला डोस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम देशभर सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. पाटणा एम्समध्ये तीन मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला.

देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर 2 ते 18 वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून एकूण 525 मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली. लसीचा डोस घेण्यासाठी 15 मुले आली होती. त्यापैकी 3 मुलांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी, मुलांची आरटी-पीसीआर आणि अँटीबॉडीज तपासणी करण्यात आली. त्यात 3 मुले चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस दिला गेला.

लस दिल्यानंतर या मुलांना जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही. आता या मुलांना लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जाणार आहे. कोव्हॅक्सिन लसीची चाचणी दिल्ली आणि पाटणा येथील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्ससह विविध ठिकाणी केली जाणार आहे.