कोविड भगाव! राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी!! 15 दिवस कडक निर्बंध

कोरोनाची दुसरी लाट थोपवायचीच या निर्धाराने पुन्हा एकदा लढाई सुरू झाली असून वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने उद्या बुधवार रात्री 8 वाजल्यापासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे.

आतापर्यंतचे काही निर्बंध अधिक कडक केले आहेत, तर काही नव्याने लागू केले आहेत. लॉकडाऊन केले असले तरी त्याला माणुसकीचा स्पर्श आहे. कारण हातावर पोट असणाऱयांची रोजी या दिवसांत मंदावली तरी त्यांना रोटी मिळावी यासाठी सरकारने तब्बल 5476 कोटी रुपयांचे जम्बो पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या लॉकडाऊनसदृश निर्बंधांची आणि मदतीची घोषणा करतानाच न चिडता, न रागावता समजून घेऊन सरकारला सहकार्य करा असे आवाहन राज्यातील जनतेला केले. आता अवघ्या राज्याचा एकच निर्धार… कोविड भगाव!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. उद्या रात्रीपासून राज्यभरात ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम व्यापकरीतीने राबवण्यात येणार असून कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नका असे मुख्यमंत्र्यांनी बजावले आहे. मनाविरुद्ध हा लॉकडाऊन करावा लागत आहे, पण रोजी-रोटीच्या बरोबरीने आधी जीव वाचवायचे आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. आता जर ते काढत बसलो तर महाराष्ट्रातील जनता कदापि माफ करणार नाही.

म्हणूनच सर्वजण एकसाथ आले तर या साथीवर निश्चितच विजय मिळवू असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आता कोणाला मदत करायची, कोरोनाला, त्याच्याशी लढणाऱया सरकारला की आरोग्य कर्मचाऱयांना हे ज्याने त्याने ठरवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, गेल्या वर्षी आपण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा पुढचा गुढीपाडवा हा कोविडमुक्त असेल अशी आशा होती, मात्र यंदा कोरोना दुप्पट वेगाने वाढतो आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात करीत आहोत.

अधिक भार टाकला तर यंत्रणा कोलमडून पडेल

भयानक पद्धतीने रुग्ण वाढत आहेत, आज एका दिवसात 60 हजार 212 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवले गेले आहेत. साधरणतः गेल्या वर्षी कोव्हिडने पहिलं पाऊल टाकलं तेव्हा काय आरोग्य सेवा होत्या. तेव्हा एक-दोन लॅब होत्या. आज जवळपास 523 चाचणी केंद्रे आहेत. तरीदेखील चाचणीचे रिपोर्ट यायला उशीर होत आहे. आता चाचणी केंद्रांवर अडीच लाखांवर चाचण्या होताहेत. कोवीड केअर सेंटर चार हजारांच्या आसपास आहेत. बेडची संख्या साडेतीन लाखांवर गेली आहे. आयसोलेशन, व्हेंटिलेटर, मध्यम लक्षणाचे बेड सर्वांचीच संख्या वाढवली आहे. मात्र तरीही सर्व सुविधांवर भार येतोय. प्रत्येक गोष्टीची क्षमता असते त्या पेक्षा अधिक भार टाकला तर काही काळानंतर यंत्रणा कोलमडून पडेल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली परीक्षा सुरू आहे, ती पुढे ढकलू शकत नाही

एमपीएससी, दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या जीवाशी खेळ नको म्हणून पुढे ढकलल्या. मात्र आता जी आपली परीक्षा सुरू झाली आहे. ती आपण पुढे ढकलू शकत नाही. लवकरात लवकर उत्तीर्ण व्हावे लागेल. चोहोबाजूंनी दडपण आहे. तरी प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा, प्रत्येक संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. मतमतांतरे असतातच,पण आता कितीकाळ चर्चा करत बसायची हे परवडणारं नाही. हा काळ निघून गेला तर मदतीला कोणी येऊ शकणार नाही, असा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची भयावह स्थितीच समोर मांडली.

हे सुरू राहणार

विमानसेवा, ट्रेन, टॅक्सी, रिक्षा आणि बससेवा सुरू राहणार
विविध देशांचे दूतावास सुरू राहणार
पावसाळ्यानिमित्त हाती घेतलेली कामे सुरू राहणार
त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या सर्व सेवासुविधा सुरू राहणार आहेत.
बंदरे आणि संबंधित सेवा सुरू राहणार
पावसाळ्यासाठी आवश्यक वस्तू तयार करणारे कारखाने तसेच यासंबंधी कच्चा माल तयार करणारे कारखाने सुरू राहणार
रिक्षात 2, टॅक्सीत एकूण क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी
बसमध्ये पूर्ण क्षमतेने बसून प्रवास करण्यास परवानगी, स्टँडिंग नाही
खासगी वाहनांना केवळ अत्यावश्यक सेवा तसेच योग्य कारणासाठी वापरण्यास परवानगी
रस्त्यावरील खाद्य विव्रेत्यांना सकाळी 7 ते 8 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. केवळ पार्सल देता येणार.
वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके सुरू राहणार.
बांधकामांना परवानगी देण्यात आली असून कामगारांना बांधकामाच्या साइटवरच राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

काय आहेत निर्बंध

उद्यापासून राज्यात 144 कलम लागू होणार असून उद्या रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
योग्य कारणाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

यावर निर्बंध

शाळा, महाविद्यालये बंद राहणार, केवळ दहावी-बारावीच्या परीक्षांपुरते सुरू करण्यास परवानगी. परीक्षेसाठी येणाऱया कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक
कोणतेही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक पिंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही.
लग्नसोहळ्यात केवळ 25 जणांना परवानगी, कर्मचारी वर्गाला कोरोना चाचणी सक्तीची
अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांना परवानगी
5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण ज्या इमारतीत आढळतील ती इमारत कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करणार

ही कार्यालये सुरू राहणार

केंद्र, राज्य सरकारी कार्यालये, सहकारी संस्था, सार्वजनिक सेवांची कार्यालये, खासगी बँका, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया पंपन्या, इन्शुरन्स, मेडिक्लेम, फार्मास्युटिकल कम्पनी, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टम ऑपरेट, बँकसेवेसह अन्य वित्तीय सेवा, कोर्ट, सुरू राहणार

कारखान्यांसाठी नियमावली

अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया कारखाने पुर्ण क्षमतेने सुरू राहणार. निर्यात क्षेत्राशी निगडीत कारखानेही सुरू राहणार. याव्यरिक्त अन्य कारखाने 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणार. 500 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कारखान्यांना स्वतःचे क्वॉरंटाइन सेंटर उभारावे लागणार.

रेमडिसीवीर कमी पडू देणार नाही

ऑक्जिनचे राज्यात 1200 मेट्रिक टन उत्पादन होत आहे. याचा 100 टक्के वापर आरोग्य सुविधांसाठी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र सध्या आपण 950 ते 1000 टन ऑक्सिजन वापरू लागलो आहोत. आपण मागणीच्या काठोकाठपर्यंत आलो आहोत. बेडस तसेच रेमडिसीवरची मागणी वाढली आहे. याआधी रेमडिसीवीरची मागणी खाली गेली. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादन थांबवलं आणि अचानक मागणी वाढली. हे औषध पुन्हा तयार करायला दोन ते तीन आठवडे लागतात. आता हळूहळू पुरवठा सुरू झाला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत औषधं कमी पडू देणार नाही. जिथे मिळतील तिथून ती घेतली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

कोरोनाला मदत करणार की सरकारला मदत करणार?

मी नियम सांगतोय पण मला आपल्याकडून त्याउलट हवं आहे. जसा आपल्याकडे जनता कर्फ्यु हा शब्द आहे. जनता ठरवते आम्ही हे करणार हे करणार नाही. तसं तुम्ही ठरवायचं आहे. आता संकट आहे तेव्हा काही अनावश्यक काम नाही तर मी कारण नसताना घराबाहेर पडणार नाही. मी कोरोनाला मदत करणार नाही तर सरकारला मदत करणार. मी माझ्या नागरिकांना मदत करणार. आपल्याला प्रत्येकाने ठरवायला हवं की कोरोनाला मदत करायची की कोरोना विरुद्ध लढणाऱया सरकारला मदत करायची, हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे. कोरोनाला मदत करणारे कोण आहेत आणि कोरोनाविरोधात लढणारे कोण आहेत. कोरोना दूत कोण आहेत आणि कोरोना योद्धे कोण आहेत हे आता आपल्याला कळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला कोरोनाविरोधात लढण्याचे आवाहन केले.

लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल

लसीकरणाचा वेग मोठय़ा प्रमाणात वाढवला. लसीकरण वाढवावंच लागेल. पण लसीकरण केल्यानंतर या लाटेतून बाहेर पडू का तर नाही.लस दिल्यानंतर प्रतिकार शक्ती यायला बराच कालावधी लागतो. लसीकरण एवढय़ासाठीच की लसीकरण केल्यानंतर तिसरी लाट थोपवता येईल. जगात अनेक लाटा येत आहेत. जसं ब्रिटनने केलं. अडीच ते तीन महिने लॉकडाऊन केला. त्या काळात त्यांनी संपूर्ण जनतेला लसीकरणातून सुरक्षित केलं. लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर आताचं तिथलं चित्र रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्यानुसार येत्या काळात आपल्याला लसीकरण वाढवावं लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बराचसा वेळ चर्चा, विनिमयात घालवला, आता कडक पावलं उचलण्याचा क्षण

नाइलाजाने काही गोष्टी बंधनात्मक कराव्या लागणार आहेत. हे निर्बंध लादतोय ते केवळ आपल्यासाठी आहेत. मला आनंद होतोय असं तुम्ही समजू नका. गेले महिनाभर कल्पना देत आलोय की हे कलं तर काय होईल ते केलं तर काय होईल. आपण बरेचसा वेळ चर्चेत विनिमयात घालवला आहे. आता कडक पावलं उचलण्याचा क्षण आला आहे. कारण ही साखळी जर का तुटली नाही तर ही साखळी आपल्याला गुरफटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला रोजी रोटी महत्त्वाची आहेच, पण त्याबरेबरीने जीव वाचवायला हवेच. जीव वाचले तर सगळं काही आहे आणि जीव वाचवणं हा आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आजपर्यंत जे निर्बंध टाकले होते. त्यात वाढ करीत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

न चिडता न रागवता, ही लढाई जिंकायला सोबत या!

यात कुठेही लपवाछपवी, अपारदर्शकता नाही. ही बंधनं नाइलाजाने आकारावी लागत आहेत. याचं कारण जगभराचा जो अनुभव आहे त्यानुसार आरोग्य सुविधा वाढवणं, लसीकरण वाढवणं गरजेचे आहे. मात्र त्याच वेळी आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी थोडीशी जी संधी लागते त्यासाठी आणि ही साखळी तोडण्यासाठी आपल्याला हे निर्बध स्वीकारावे लागत आहेत. हे सर्व जगाने स्वीकारलेलं सत्य आहे. ही बंधनं एकतर्फी टाकलेली नाहीत. केवळ प्राण वाचवणं हाच उद्देश आहे. आजपर्यंत जे सहकार्य केलंत, जसं कुटुंबातील मानता. त्याच तळमळीने आणि त्याच आपुलकीने माझ्यावर टीका करणारे कितीही असले तरी त्या टीकेची पर्वा न करता आपल्याशी जी बांधिलकी आहे त्या बांधिलकीला स्मरून आणि तिला जागून मी केवळ आणि केवळ माझ्या राज्याच्या माझ्या बांधव माताभगिनींसाठी हे निर्बंध लादत आहे. कृपा करून न चिडता न रागवता समजून घेऊन सहकार्य करा आणि ही लढाई जिंकायला नुसती मदत नाही तर सैनिक म्हणून सोबत या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

आपण शांत बसलेलो नाही

पहिली लाट आता जर बघितली तर या लाटेच्या तुलनेत काहीच नव्हती. अजून आपण पिकच्या जवळ गेलोय की नाही हे सांगता येत नाही. गेल्यावर्षी आपल्याच जिद्दीमुळे जे काही चित्र दाखवलं गेलं त्यापेक्षा कितीतरी खाली आपण कोरोनाला नियंत्रणात ठेवलं. तेव्हा कोरोनावर नियंत्रण मिळवून दाखवलेलं आहे. गेल्या वेळी जी आरोग्य सुविधा वाढवली ती आता तोकडी पडतेय. मात्र तरीही आपण जिद्दीने लढणार आणि जिंकणार. कोणत्याही परिस्थितीत आपण शांत बसलेलो नाही, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला.

आता उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र माफ करणार नाही

बांधवांनो आणि भगिनींनो ही उणीदुणी काढण्याची वेळ नाही. सर्व राजकीय पक्षांना पुन्हा आवाहन करतो की उणीदुणी काढत बसू नका. आता जर उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. माननीय पंतप्रधानांना विनंती केली की देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावून सांगा की आता राजकारण करू नका. हे फार मोठं संकट आहे. जर आपण याला साथ म्हणत असू तर याविरोधात आपल्याला एकसाथ लढायला हवं, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केले.

महाराष्ट्रावर ओढवलेल्या संकटात लढण्यासाठी पुढे या!

औषधं, ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. आपण पुन्हा एकदा आरोग्य सुविधा वाढवतोय. जिथे जिथे जे जे करणं शक्य आहे ते कोरतो आहोत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, क्वॉरंटाइन सेंटर वाढवतोय. पण हे एकतर्फी झालेय. ही आरोग्य सुविधा वाढविल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर्स लागणार. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आपण आवाहन करीत आहोत. त्यांना सोबत घेत आहोत. त्याचबरोबरीने निवृत्त झालेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना आवाहन करतो की, तुम्हीसुद्धा महाराष्ट्रावर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटात लढण्यासाठी पुढे या. स्वयंसेवी संस्थांना आवाहन करतो की आता वेळ आलेली आहे. जे करू शकाल ते करण्यासाठी सरकारच्या सोबत या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोणाला काय मिळणार

व्यवसाय/योजना रक्कम / धान्य लाभार्थी
बांधकाम कामगार प्रत्येकी 1500रु. 12 लाख
घर कामगार प्रत्येकी 1500रु. 25 लाख
अधिकृत फेरीवाले प्रत्येकी 1500रु 5 लाख
परवानाधारक रिक्षा चालक प्रत्येकी 1500रु. 12 लाख
आदिवासी खावटी योजना प्रतिकुटुंब 2000रु. 12 लाख
शिवभोजन योजन एक महिना मोफत 2 लाख
अन्न सुरक्षा योजना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ मोफत 7 कोटी
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, विधवा निवृत्ती वेतन, दिव्यांग निवृती वेतन या पाच योजनांतील लाभार्थ्यांना

या योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल. 35 लाख

कोरोना सुविधा उभारणीसाठी 3 हजार 300 कोटी

जिल्हास्तरावरील टाळेबंदीच्या काळातील कोरोना व्यवस्थापनासाठी सुमारे 3 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून कोरोनावरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी संबंधित जिह्याला निधी दिला जाईल. हा निधी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना असतील.

कर देयके बिनव्याजी

स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
निवृत्त झालेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना आवाहन करतो की, तुम्हीसुद्धा महाराष्ट्रावर ओढवलेल्या या नैसर्गिक संकटात लढण्यासाठी पुढे या. स्वयंसेवी संस्थांना आवाहन करतो की आता वेळ आलेली आहे. जे करू शकाल ते करण्यासाठी सरकारच्या सोबत या.
आता हळूहळू रेमडेसिवीरचा पुरवठा सुरू झाला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत औषधं कमी पडू देणार नाही. जिथे मिळतील तिथून ती घेतली जातील.

केंद्राकडे मागणी – नैसर्गिक आपत्तीच्या निकषानुसार मदत द्या

भूकंप, परिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत केंद्र सरकारकडून राज्याला आर्थिक मदत दिली जाते. कोविडची ही महामारी नैसर्गिक आपत्तीच आहे. या आपत्तीत आता केंद्र सरकारने मदत करावीच, पण ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीचेच निकष लावावेत, अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांची रोजीरोटी संकटात सापडली आहे, सापडणार आहे त्यांना वैयक्तिक मदत करताना केंद्राने नैसर्गिक आपत्तीचेच निकष लावावेत असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हवाईमार्गे प्राणवायू आणू द्या! ऑक्सिजन वाहतुकीसाठी लष्कराची मदत मागितली

राज्यात दिवसाला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. त्यातील हजार मेट्रिक टनचा वापर कोविड रुग्णांसाठी होत आहे. ऑक्सिजन ही सध्या आत्यंतिक गरज असून सिलिंडर वाहतुकीसाठी लष्कराने मदत करावी अशी विनंतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

चार दिवसांपूर्वी जेव्हा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेजारच्या राज्यातून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्राने कुठल्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो याची यादी पाठवली.

मात्र महाराष्ट्र आणि ते संबंधित राज्य यांच्यातील भौगोलिक अंतर लक्षात घेता रस्ते वाहतुकीने ऑक्सिजन आणणे अत्यंत जिकिरीचे आणि वेळखाऊपणाचे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. म्हणूनच हवाईमार्गे प्राणवायू आणू द्या, अशी विनंतीच पत्र पाठवून आणि दूरध्वनी करून पंतप्रधानांना करणार आहोत असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जीएसटी परताव्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ द्या!

दरवर्षी मार्च महिन्यात जीएसटी परतावा दाखल करावा लागतो. लॉकडाऊनमुळे लघुउद्योजकांना हा परतावा वेळेत भरणे अडचणीचे ठरणार आहे. म्हणूनच त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. या लघुउद्योजकांना आधार देण्यासाठी हे करावे लागेल. पंतप्रधानांना आपण तशी विनंती करणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली परीक्षा सुरू आहे, ती पुढे ढकलू शकत नाही

एमपीएससी, दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या जीवाशी खेळ नको म्हणून पुढे ढकलल्या. मात्र आता जी आपली परीक्षा सुरू झाली आहे. ती आपण पुढे ढकलू शकत नाही. लवकरात लवकर उत्तीर्ण व्हावे लागेल. चोहोबाजूंनी दडपण आहे. तरी प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा, प्रत्येक संवाद करण्याचा प्रयत्न करतोय. मतमतांतरे असतातच,पण आता कितीकाळ चर्चा करत बसायची हे परवडणारं नाही. हा काळ निघून गेला तर मदतीला कोणी येऊ शकणार नाही, असा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची भयावह स्थितीच समोर मांडली.

काय सुरू

मालवाहतूक, पाणीपुरवठा, शेती क्षेत्रातील सर्व सुविधा सुरू राहणार
किराणा, भाजीपाला, फळ विव्रेते, दूध पुरवठा, बेकरी, यासह सर्व अन्नधान्याची दुकाने, शीतगृहे, गोदामे सुरू राहणार
धान्याची आयात-निर्यात सुरू राहणार, त्याचप्रमाणे ईकॉमर्सच्या अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे.
रिझर्व्ह बँकेने अत्यावश्यक म्हणून ठरवलेल्या सर्व वित्तीय सेवा सुरू राहणार.
वृत्तपत्रे सुरू राहणार, वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू.
टेलिकॉम सेवांचे देखभाल दुरुस्तीचे कामे सुरू राहणार, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस, माहिती-तंत्रज्ञान सेवा सुरू राहणार
पेट्रोल पंप तसेच पेट्रोलियम उत्पादने यांची वाहतूक तसेच उत्पादनांना परवानगी
सरकारी आणि खासगी सुरक्षा व्यवस्था सुरू राहणार, एटीएम, पोस्ट खात्याच्या सेवा सुरू राहणार

काय बंद

चौपाटय़ा, उद्याने, मोकळी मैदाने बंद राहणार
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार
रेस्टॉरंट आणि बार बंद राहणार. केवळ पार्सल सेवेसाठी परवानगी
धार्मिक स्थळे बंद राहणार, पूजा-अर्चा मात्र सुरू राहणार असून या कर्मचाऱयांचे लसीकरण करणे बंधनाकारक आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता मॉल, शॉपिंग सेंटरमधील सर्व दुकाने बंद
सिनेमा हॉल, नाटय़गृहे, अॅम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, क्लब, स्विमिंग पूल, जीम आणि क्रीडा संकुले बंद राहणार.
केशकर्तनालये, स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर बंद राहणार. कर्मचाऱयांनी व्हॅक्सिन घेतल्यास सुरू करण्याबाबत विचार.

आपली प्रतिक्रिया द्या