सप्टेंबरपर्यंत येणार लहान मुलांची लस, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांना विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात लहान मुलांसाठी सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस येईल, असा विश्वास एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी व्यक्त केला. सद्यस्थितीत लहान मुलांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल केली जात आहे. या चाचणीचा निकाल ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत येईल आणि देशात लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल, असे ते म्हणाले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट धडकी भरवत असतानाच डॉ. गुलेरिया यांनी शनिवारी ही दिलासादायी माहिती दिली. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱया लाटेमध्ये मुलांमध्ये अधिक प्रमाणात संसर्ग होण्याची भीती जाणकारांनी याआधीच व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने सरकारने मुलांच्या लस उपलब्धतेसाठी गती दिली आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याकामी लस हा सर्वोत्तम उपाय असेल. झायडस पॅडिलाने लसीची चाचणी केली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळणे बाकी आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची मुलांवर सुरू असलेली चाचणीसुद्धा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते. तोपर्यंत मुलांच्या लसीला सरकारकडून ’हिरवा झेंडा’ दाखवला जाऊ शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. फायजर पंपनीने लहान मुलांसाठी बनवलेल्या लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने याआधीच मंजुरी दिली आहे. हिंदुस्थानातही आम्ही सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू करू आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश मिळवू, असा विश्वास डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे.

संक्रमण कमी असलेल्या भागांत शाळा सुरू व्हाव्यात!

कोरोनाचे संक्रमण कमी असलेल्या भागांमध्ये पुरेशी खबरदारी घेऊन टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या पाहिजेत. महामारीत पालक संगणक व मोबाईल उपलब्ध करू न शकल्यामुळे अनेक मुलांना शाळा सोडावी लागली आहे. अनेकांना योग्यप्रकारे शिकता येत नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या लसीचे डोस येत्या काही आठवडय़ांत उपलब्ध झाल्यास मुलांना सुरक्षा व पालकांना दिलासा मिळेल, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.