कोविन ‘ऍप’टला! लसीकरणासाठी तासन्तास खोळंबा; सुधारणेसाठी पालिकेचे केंद्र, राज्य सरकारला पत्र

मुंबईत पालिका आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून 1 मार्चपासून तिसऱया टप्प्याचे लसीकरण सुरू झाले असले तरी केंद्राच्या ‘कोविन’ अॅपमधील गोंधळामुळे लसीकरणाला फटका बसत असून ज्येष्ठांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक वेळा ‘कोविन’अॅप डाऊनलोड होत नाही. डाऊनलोड झालेच तर लसीकरण केंद्राची नावे, लाभार्थ्यांची नावे गायब असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे या अॅपमध्ये तातडीने सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र दिले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईसह महाराष्ट्र-देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि दुसऱया टप्प्यात प्रंटलाइन वर्पर्सना लस देण्यात येत असून आता तिसरा टप्पाही सुरू झाला आहे. या लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या सामायिक ‘कोविन’ अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

यामध्ये ऑनलाइन आणि आता थेट लसीकरण केंद्रावर त्या ठिकाणच्या कर्मचाऱयांकडून ‘कोविन’ अॅपमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे अॅप डाऊनलोडच होत नाही. नाव, तारीख, केंद्र भरले जात नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रावर दोन ते पाच तासांपर्यंत लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. यामुळे काही ठिकाणी लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्टय़ गाठणे कठीण बनत आहे.

सर्वांना लस मिळणार, गर्दी करू नका!

पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत सवादोन लाखांवर लसीकरण पूर्ण झाले असून आताही 5 लाखांहून जास्त डोस परळच्या कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार लसींचा साठा येत आहे. त्यामुळे तिसऱया टप्प्यातील 25 लाखांसह सर्वांना लस देण्यासाठी आवश्यक डोस मिळणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, शक्यतो ऑनलाइन ‘कोविन’ अॅपवर नोंदणी करूनच यावे, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून काकाणी यांनी केले आहे.

लांबच लांब रांगांमध्ये वृद्धांची रखडपट्टी

कोरोना लसीकरणाच्या तिसऱया टप्प्यात 45 ते 59 वर्षे वयोगट, 60 वर्षांवरील ज्येष्ठ आणि सहव्याधी असणाऱयांना लसीकरण करण्यात येत आहे. आता थेट केंद्रावरच ‘कोविन’ अॅपमध्ये नोंदणीची संधी उपलब्ध करून दिल्याने मोठय़ा संख्येने संबंधित वयोगटातील नागरिक गर्दी करीत आहेत.

यामध्ये वयोवृद्धांची संख्याही मोठी आहे. मात्र संबंधित केंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात नागरिक येत असल्याने व्यवस्थेची तारांबळ उडत आहे. लांबच लांब रांगा लागल्याने ज्येष्ठांची रखडपट्टी होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांचा मुलगा किंवा मुलगी किंवा इतर पुणी नातेवाईकही आल्याकारणाने लसीकरण केंद्राच्या गर्दीत भरच पडली होती.

आपली प्रतिक्रिया द्या