‘कोविन’चा डेटा लीक, हजारो हिंदुस्थानींची माहिती टेलिग्रामवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविन या कोरोना लसीकरण पोर्टलवरून हजारो हिंदुस्थानींचा डेटा लीक झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधारकार्ड आणि पॅनकार्डचा तपशील टेलिग्रॉम या मेसेजिंग अॅपवर उपलब्ध झाल्याचा दावा सोमवारी करण्यात आला.

कोविन पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकला जातो तेव्हा टेलिग्राम बॉट लसीकरणासाठी वापरला जाणारा ओळखपत्र क्रमांक, लिंग, जन्म तारीख आणि लसीकरण केंद्राचे नाव दिसते. या डेटा ब्रीचमुळे टेलिग्रामवर देशातील नागरिकांचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड उपलब्ध आहेत. कोरोना लसीकरणासाठी अनेक जण एकाच मोबाईल क्रमांकावरून कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही लसीकरणाचे स्लॉट बुक करायचे. या मोबाईल क्रमांकाद्वारे टेलिग्राम बॉटवर सर्व माहिती एकाच वेळी दिसत आहे, असे ‘मलयाला मनोरमा’च्या अहवालानुसार समोर आले आहे.

ज्या लोकांचा डेटा लीक झाला आहे, त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांचादेखील समावेश आहे. कोविन पोर्टलवर वन टाइम पासवर्ड ओटीपी सुविधादेखील देण्यात आली होती.

कोविन पोर्टल हॅक?

टेलिग्रामवर हा डेटा कसा लीक झाला, हे अद्यापर्यंत समजू शकलेले नाही. देशातील कोविन पोर्टल हॅक झाल्याचा संशय 2021 साली वर्तविण्यात आला होता. 150 दशलक्ष लोकांचा डेटाबेस विक्रीसाठी होता. अनेक सायबर सुरक्षा संशोधकांनी हा दावा नाकारला होता.