
तालुक्यातील असंख्य गाय, बैल व वासरांना विचित्र आजाराने ग्रासले आहे. गेल्या आठवडाभरात चार जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर तीन जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आदिवासी पट्टयातील शेतकरी हवालदिल झाला असून अनेक जनावरांनी चारा, पाणी सोडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन विचित्र आजारावर उपचार करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी, शेळकेवाडी, राजेवाडी या गावांमधील जनावरांना हा विचित्र आजार जडला आहे. सात दिवसांत या गावांमधील शेतकरी भीमराव सारक्ते १, राजेवाडी येथील निवृत्ती निकम १, चंद्रकांत घाटाळ १, कोंडाजी ठोंमरे १ या शेतकऱ्यांची एकूण चार जनावरे दगावली, तर अनेक जनावरे या विचित्र आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. जनावरांच्या फऱ्याला सूज येणे, पोट फुगणे, गळा सुजणे, ताप येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले आहे. दगावलेल्या जनावरांची शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ही जनावरे पोट फुगणे, गळा सुजणे अशा आजाराने ग्रस्त असल्याने त्यावर उपचार करूनही ती मृत्युमुखी पडली. हा संसर्गजन्य रोग आहे की नाही हे निश्चित सांगू शकत नाही, परंतु गावातील सर्व जनावरांना लसीकरण केले आहे. सध्या लस उपलब्ध नसून जिल्हा कार्यालयात लसीकरणासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
डॉ. राजेश
हरापले, सहाय्यक पशुधन अधिकारी.

































































