सीपी टँक घेणार मोकळा श्वास; दहा दिवसांत ठाणे पालिका उचलणार कचऱ्याचे ढीग

वागळे इस्टेट भागात असलेल्या सीपी टँक येथील कचरा कोंडीमुळे पालिकेवर चौफेर टीका झाल्यानंतर साचलेला कचरा उचलण्याचे काम २४ तास सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत १०० डंपर कचरा साफ करण्यात आला आहे. तसेच येत्या दहा दिवसांत साचलेल्या कचऱ्याचे ढीग उचलल्यानंतर सीपी टैंक मोकळा श्वास घेणार आहे.
ठाणे शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील साचून राहिलेला कचरा तातडीने आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरित करण्याची प्रकिया आता सुरू झालेली आहे. तीन सत्रात जादा वाहनांचा वापर करून कचऱ्याचे हस्तांतरण करण्यात येत आहे. त्यासाठी कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या दररोज ७५ हून अधिक फेऱ्या वाढवल्या आहेत. रविवारी ७५ डंपर तर आज तब्बल ८० डंपर कचरा हटवण्यात आला. दरम्यान सीपी तलाव केंद्रावर सुमारे १० हजार मेट्रिक टन कचरा असण्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.

  • ठाणे पालिका हद्दीत दररोज १ हजार मॅट्रिक टन कचरा जमा केला जातो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी डायघर येथे प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. दुसरीकडे आतकोली येथे नव्याने उभारण उभारण्यात आलेला प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेला नव्हता.
  • दरम्यान येथे साचलेल्या कचऱ्याची क्षमता संपली असल्याने हा सर्व कचरा शहरातील रस्त्यावर आला होता.

पदभार घेताच लक्ष केंद्रित
आतापर्यंत घनकचरा विभागाचा पदभार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी कचरामुक्त ठाणे करून दाखवले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान आता या विभागाचा पदभार शासनाकडून आलेल्या उपायुक्त मधुकर बोडके यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी देण्यात आल्यानंतर सर्वात प्रथम सीपी तलाव कचरामुक्त करण्यावर लक्ष बोडके यांनी केंदित केले आहे.

पूर्वी कचरा उचलण्याचे काम केवळ दिवसा सुरू होते. आता दिवस रात्र हे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी गाड्यांच्या फेऱ्यादेखील वाढवण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत सीपी तलाव पूर्ण रिकामी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मधुकर बोडके, उपायुक्त, घनकचरा विभाग